जनसंकल्प यात्रेदरम्यान ते नवी दिल्लीला भेट देऊन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करणार आहे असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
डॉ. प्रभाकर कोरे यांच्या अमृता महोत्सवाच्या कार्यक्रमाला रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी बेळगावात आज सांबरा विमानतळावर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बेळगावकरांसाठी काही चांगली बातमी आहे का, या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय झाल्यावर सर्वांना माहिती दिली जाईल.
दरम्यान, कोल्हापुरातील कणेरी मठात कन्नड भवन बांधण्यास शिवसेनेने केलेल्या विरोधाला प्रत्युत्तर म्हणून, महाराष्ट्रात विविध संघटनांची दहा कन्नड भवने आधीच अस्तित्वात आहेत. तसेच अनेक मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे आहेत. या प्रकरणात राज्य आणि भाषांचा अडथळा होता कामा नये, असे ते म्हणाले.
या प्रसंगी पुढे बोलताना बोम्मई म्हणाले, केएलईचे कार्याध्यक्ष प्रभाकर कोरे यांचा अमृतमहोत्सव साजरा होणे ही आनंदाची बाब आहे. त्यांनी चार दशके संपूर्ण उत्तर कर्नाटकची अप्रतिम सेवा केली आहे. ते शिक्षण, आरोग्य, कृषी, सहकार क्षेत्रात लोकप्रिय आहेत. सतत लोकांमध्ये राहून त्यांच्यासाठी काम करणाऱ्या कोरे यांच्यात एक अद्वितीय ऊर्जा आहे. ते एक प्रेमळ व्यक्ती असून सर्वांशी मैत्रीपूर्ण वागतात. हा सोहळा सार्थ ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.


Recent Comments