Belagavi

कणेरी मठात कर्नाटक भवन उभारणीला शिवसेनेचा कडाडून विरोध

Share

कोल्हापूरजवळील सिद्धगिरी येथील कणेरी मठात कर्नाटक भवन उभारणीसाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोमवारी पायाभरणी केली होती. या नियोजित कर्नाटक भवनला शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आणि शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी कणेरी मठातील कर्नाटक भवनला कडाडून विरोध केला आहे. वर्षानुवर्ष कर्नाटक सरकार सीमाभागातील मराठी भाषिकांची गळचेपी करत असताना महाराष्ट्रात ‘कर्नाटक’ हे नाव कशासाठी? असा सवाल जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केला आहे. महाराष्ट्रात कर्नाटक भवन हे महाराष्ट्र राज्य सरकारचे अपयश असून, कोणत्याही परिस्थितीत हा प्रयत्न हाणून पाडण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

 

शिवसेना कोल्हापूर शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनीही विरोधाची तोफ डागली आहे. धार्मिक कार्यक्रमाच्या आडून कोणी राजकीय पक्षांचे काम करणार असेल, तर त्याला थारा दिला जाणार नाही, असा इशारा रविकिरण इंगवले यांनी दिला आहे. शिवसेनेकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यावरून कर्नाटक भवनमुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

Tags:

shivsena uddhav balasaheb thackeray opposed to karnatak bhavan cm bommaiah