Savadatti

अतिवृष्टीमुळे घरे कोसळलेल्या नुकसानग्रस्तांची भरपाईसाठी पायपीट

Share

मुसळधार पावसामुळे कोसळलेल्या घरांची नुकसान भरपाई मिळविण्यासाठी नुकसानग्रस्त कुटुंबियांना विविध कार्यालयांचे दरवाजे ठोठवायची वेळ आली आहे. सौंदत्ती तालुक्यातील ऐनगी या गावातील नुकसानग्रस्ताने भरपाईची विचारणा करण्यासाठी ग्राम पंचायत उपाध्यक्षांना विचारण्यात आले असता पैशांची मागणी करण्यात आल्याची बाब पुढे आली आहे.

८ ऑगस्ट रोजी सौंदत्ती तालुक्यातील इटगी या गावातील बाबूसाब नाबीसाब सुतगट्टी यांचे घर अतिवृष्टीमुळे कोसळले. दुसऱ्या घराची व्यवस्था नसल्याने सुतगट्टी कुटुंब सध्या या कोसळलेल्या घरातच राहात आहे. अतिवृष्टीमुळे घरे कोसळलेल्या नुकसानग्रस्तांना ५ लाख रुपयांची भरपाई सरकारने जाहीर केली आहे. मात्र या कुटुंबाला केवळ ५० हजार रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. सदर कुटुंबीयांनी नुकसान भरपाईसाठी ग्राम पंचायत उपाध्यक्षांकडे मागणी केली असता उपाध्यक्षांनी ५० हजारांची लाच मागितल्याची बाब पुढे आली असून संतप्त कुटुंबीयांनी गुरुवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय गाठून न्याय मागितला आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले काडा अध्यक्ष डॉ.विश्वनाथ पाटील यांच्याकडेही कुटुंबीयांनी आपले गाऱ्हाणे मांडले.

यासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना नुकसानग्रस्त कुटुंबीयांनी सांगितले, ज्या घरांची अल्प प्रमाणात पडझड झाली आहे त्यांना ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येत आहे. मात्र आपल्या घराची पडझड मोठ्या प्रमाणात होऊनही आपल्याला नुकसान भरपाई देण्यात आली नाही. यासाठी आपण ग्राम पंचायत उपाध्यक्षांकडे विचारणा केली असता त्यांनी आपल्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप नुकसानग्रस्त कुटुंबीयांनी केला.

घरांच्या पडझडीनंतर अनेक ठिकाणच्या नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई न मिळाल्याची तक्रार पुढे आली आहे. एकीकडे संपूर्ण घराची पडझड होऊनही भरपाई मिळाली नाही तर दुसरीकडे काही प्रमाणात पडझड झालेल्या नुकसानग्रस्तांना संपूर्ण नुकसानभरपाई मिळाली आहे. या प्रकाराकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष पुरवून तातडीने या समस्येवर तोडगा काढावा अशी मागणी होत आहे.

Tags:

savadatti-house-collapse-dc-memo