Belagavi

प्रभाकर कोरे यांचा गुरुवारी अमृतमहोत्सव : धर्मेंद्र प्रधान यांची उपस्थिती

Share

बेळगाव जगाच्या नकाशावर कुठे आहे हे दाखवण्यात केएलईचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांची भूमिका मोलाची आहे. या कर्मऋषीचा अमृतमहोत्सव बेळगावात येत्या गुरुवार दि. १५ ऑक्टोबर रोजी भव्य पप्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याला धर्मेंद्र प्रधान, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी दिली.

बेळगावात आज केएलईचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्या अमृतमहोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत खा. इरण्णा कडाडी यांनी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, प्रभाकर कोरे यांनी 75 वर्षांचे संपूर्ण आयुष्य समाजासाठी दिले आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाकर कोरे यांचा गौरव करण्यासाठी या अमृतमहोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान या अमृत महोत्सव कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

त्याशिवाय केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, जगदीश शेट्टर, आर. व्ही. देशपांडे, शामनूर शिवशंकरप्पा, राधाकृष्ण विखे-पाटील आदी मान्यवर येण्याची अपेक्षा आहे. केंद्रातील नेत्यांप्रमाणे कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विविध नेते सहभागी होणार आहेत. बेळगाव जगाच्या नकाशावर कुठे आहे हे दाखवण्यात प्रभाकर कोरे यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे राज्यातील जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घ्यावेत, अशी विनंती त्यांनी केली.

यावेळी माजी परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ म्हणाले, डॉ. प्रभाकर कोरे यांच्याकडे आपण केवळ एक व्यक्ती म्हणून पाहत नाही. त्याऐवजी 75 वर्षांच्या अखंड समाजसेवेचा विचार करून त्यांच्याकडे पाहिले पाहिजे. म्हणून आम्ही कोरे यांचा 75 वा वाढदिवस अमृतमहोत्सव कार्यक्रम भव्य पद्धतीने साजरा करत आहोत. त्यांचे कार्य पुढील पिढीसाठी आणि तरुण पिढीसाठी मार्गदर्शक आहे. आमच्या अमृतमहोत्सव टीमने बेळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला भेट दिली आहे.

प्रत्येक मतदारसंघातील सर्व लोकांची नि:पक्षपातीपणे भेट घेतली तर. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्यांसह सर्व सहकारी क्षेत्रातील व्यक्तींनाही आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात कर्नाटकातील विविध जिल्ह्यांसह देशातील विविध राज्यातील जनता आणि नेते पक्षभेद न बाळगता सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात सुमारे 1 लाख लोक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. १५ ऑक्टोबरला येणाऱ्या एक लाख लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. दुपारी दोन वाजता जिल्हा स्टेडियमवर अमृतमहोत्सवाचा कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना आ. महांतेश कौजलगी म्हणाले, कोरे यांनी या देशासाठी शिक्षण, राजकारण आणि कृषी यासह सर्व क्षेत्रात स्वत:चे योगदान दिले आहे. या संदर्भात या भागातील सर्व ज्येष्ठ मंडळी त्यांचा अमृत महोत्सव कार्यक्रम आयोजित करत आहेत. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यातील बरेच लोक येऊन शुभेच्छा देणार आहेत. त्यामुळे सर्वांनी येऊन कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

या पत्रकार परिषदेत कित्तूरचे आमदार महांतेश दोडगौडर, भाजपचे राज्य प्रवक्ते एम. बी. जिरली आदी उपस्थित होते.

Tags:

prabhakar kore birthday iranna kadadi