ऑनलाइन कामासह विविध कामांसाठी दबाव आणण्याच्या सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी बेळगावात आज आशा वर्कर्सनी तीव्र आंदोलन केले.
बुधवारी आशा वर्कर्स असोसिएशनच्या बेळगाव जिल्हा समितीतर्फे भव्य निषेध रॅली काढण्यात आली होती. शहरातील सरदार मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या रॅलीत आशा कार्यकर्त्यांनी राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.

गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याची तक्रार करत सरकारविरोधात यावेळी आशा कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. अनेक आशा कार्यकर्त्या याच पगारावर आयुष्य जगतात. काही आशा वर्कर्स विधवा आहेत. मात्र याचा किंचितही विचार सरकारने केला नसून दरमहा देण्यात येणारे वेतनही वेळेत देण्यात येत नाही. शिवाय ऑनलाईन कामकाजाचा दबाव आपल्यावर आणण्यात येत असून जबरदस्तीने कामे करून घेतली जात आहेत.
अद्याप स्मार्टफोन देण्यात आला नाही मात्र स्मार्टफोनवर विविध कामे करण्याची सूचना देण्यात आली आहे. शिवाय सदर काम पूर्ण न झाल्यास वेतन कपात करण्याची धमकी देण्यात येत आहे. कोविडकाळात आपल्या जीवाची पर्वा न करता आशा कार्यकर्त्यांनी काम केले असून त्यांच्या या कार्याची दखल देखील घेतली जात नसून आपल्याला वेळेत वेतन द्यावे यासह इतर मागण्या तातडीने पूर्ण करण्यात याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी जिल्हा उपाध्यक्षा सुजाता काडमठद बोलताना म्हणाल्या, आपल्याला ५ हजार रुपये वेतन निश्चित केले आहे. मात्र हे वेतन आपल्याला परवडणारे नाही. शिवाय सरकारने आपल्यावर ऑनलाईन कामाचाही दबाव टाकला असून हि कामे न केल्यास वेतन कापण्याची धमकी देत असल्याबाबत त्यांनी संताप व्यक्त केला.
यावेळी आणखी एका आशा वर्करने बोलताना सांगितले, आयुष्मान भारत आरोग्य योजनेअंतर्गत आभा कार्ड देण्यात येत असून याची माहिती घेण्यासाठी घरोघरी जावे लागत आहे. आशा कार्यकर्त्यांना ऑनलाईन काम करण्यासाठी सांगितले जाते आहे. अनेक आशा कार्यकर्त्यांचे शिक्षण सातवीपर्यंत झाले असून ऑनलाईन कामकाजात त्यांना अडचणी येत आहे. माता आणि बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यात आपण यश मिळविले आहे परंतु आपल्याला समजत नसलेल्या गोष्टी करण्यास भाग पाडले जात आहे, हे थांबविण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी आंदोलन स्थळी येऊन डीएचओ डॉ. महेश कोणी यांनी आशा कार्यकर्त्यांच्या मागण्या ऐकून निवेदन स्वीकारले. यावेळी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील हजारो आशा कार्यकर्त्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.


Recent Comments