बेळगाव तालुक्यातील मच्छे ओंकार नगरजवळ वाघवडे रस्त्यावर ट्रकच्या चाकाखाली सापडून युवक जागीच ठार झाला. ही दुर्घटना काल मंगळवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली.

30 वर्षीय सोमलिंग बसवराज आलदकट्टी असे या दुर्घटनेत ठार झालेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. सोमलिंग हा मूळचा बैलहोंगल तालुक्यातील होळेहोसूर गावचा आहे. पत्नीसमवेत तो मच्छे येथील लक्ष्मीनगरात भाड्याच्या घरात रहात होता. सध्या बेरोजगार असलेला सोमलिंग नोकरीच्या शोधात होता. त्यामुळेच काल सायंकाळी नोकरीसाठी चौकशी करण्यासाठी दुचाकीवरून तो एका कंपनीत गेला होता.
तेथून परतताना वाघवडे रस्त्यावर ओंकारनगर नजीक मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली सापडून तो जागीच ठार झाला. अपघातस्थळी रक्ताचा सडा पसरला होता. त्यामुळे भीषण दृश्य दिसत होते. पती सोमलिंगचा मृतदेह पाहून त्याची पत्नी अश्विनी हिने एकच आक्रोश व्यक्त केला. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा इस्पितळात पाठवून देण्यात आला. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात दुर्घटनेची नोंद करण्यात आली आहे.


Recent Comments