Belagavi

तिसऱ्या रेल्वे गेट नजीकच्या उड्डाणपुलाचे उदघाटन

Share

बेळगाव शहरात टिळकवाडी येथील तिसऱ्या रेल्वे गेटनजीक उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे उदघाटन बुधवारी खासदार मंगल अंगडी यांच्याहस्ते करण्यात आले.

टिळकवाडी येथील तिसऱ्या रेल्वे गेटनजीक उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचा शुभारंभ खासदार मंगला अंगडी यांच्याहस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. गेल्या चार वर्षांपूर्वी दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांच्याहस्ते या उड्डाणपुलाच्या कामकाजाचा प्रारंभ करण्यात आला होता. या उड्डाणपुलाचे कामकाज पूर्ण झाले असून आजपासून नागरिकांना वाहतुकीसाठी हा उड्डाणपूल खुला करण्यात आला आहे.

उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळ्यानंतर बोलताना खासदार मंगल अंगडी म्हणाल्या, या उड्डाणपुलाचे उदघाटन करताना आपल्याला अत्यानंद होत आहे. दिवंगत सुरेश अंगडी यांचे स्वप्न असलेल्या या उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा आज पार पडला असून केंद्राच्या परवानगीने शहरात आणखी तीन उड्डाणपूल उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील रेल्वेस्थानकाचादेखील कायापालट करण्यात आला असून नव्या रेल्वेस्थानकाच्या उदघाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्याचा विचार सुरु असल्याचे खा. मंगल अंगडी म्हणाल्या.

यावेळी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी रेल्वेस्थानकाच्या कामकाजात होत असलेल्या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त केली. बागलकोट-कुडची रेल्वे मार्गाचे कामकाजदेखील संथगतीने सुरु असून गेल्या १० वर्षांपासून हे काम रखडले आहे. हुबळी कार्यालयात अधिकारी भेटत नाहीत आणि खासदारांच्या कार्यालयात आल्यानंतर देखील खासदारांची भेट होत नाही. यासंदर्भात आपण आमदार अभय पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि मुख्यमंत्र्यांचीहि भेट घेणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी आमदार अभय पाटील यांनीही रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात नाराजी व्यक्त केली. बेळगावमध्ये रेल्वे उड्डाणपूल निर्मिती सुरेश अंगडी यांनी सुरु केली. त्याचप्रमाणे उत्तर कर्नाटकात रेल्वे योजनाही सुरेश अंगडी यांनी कार्यान्वित केल्या. मात्र गेल्या चार वर्षांपासून रेल्वे विभागाची कामे रखडली असून रेल्वे उड्डाणपुलासाठी चार वर्षांचा कालावधी लागला. यामुळे जनताही आपल्यावर नाराजी व्यक्त करत असल्याचे ते म्हणाले. कंत्राटदारांना नोटीस दिल्या, मात्र याकडेही दुर्लक्ष झाले. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कामे अर्धवट राहिली आणि याचा त्रास जनतेला सोसावा लागला. उद्घाटन कार्यक्रमात माईक देखील योग्य पद्धतीने लावण्यात आला नसल्याबद्दल आमदारांनी नाराजी व्यक्त केली.

यावेळी आमदार अनिल बेनके बोलताना म्हणाले, बेळगावमधील नियोजित दोन नवे उड्डाणपूल हे आपल्या मतदारसंघात येतात. या उड्डाणपुलांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, तसेच नव्याने नूतनीकरण केलेल्या रेल्वे स्थानकाचेही लवकरात लवकर उद्घाटन करण्यात यावे. याबाबत अधिकाऱ्यांनी तातडीने काम करावे असे त्यांनी सुचविले. शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून शहरातील सर्व रेल्वे मार्गांवर उड्डाणपूल उभारणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी या कार्यक्रमास राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, बेळगाव दक्षिण मतदार संघाचे आमदार अभय पाटील, उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके, विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

Tags:

belgaum 3rd gate inauguration