काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी समाजवाद केंव्हाचाच घरी गुंडाळून ठेवला आहे. आता ते एका लहान मुलाच्या हाताखाली काम करतात. त्याने धाव म्हटले की ते धावतात. बस म्हटले की, ते बसतात. त्यांनी स्वाभिमान गमावला आहे, अशी टीका मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली.
रायचूर तालुक्यातील गिल्लेसूगुर गावात आयोजित भाजपच्या जनसंकल्प मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री बोम्मई यांनी विरोधी पक्ष नेते सिद्धरामय्या यांच्यावर टीकेची तोफ डागली. सिद्धरामय्या हे खोटे बोलणारे आघाडीचे नेते आहेत. अहिंद नेते म्हणवून घेणाऱ्या सिद्दरामय्यांच्या मागे दलित नाहीतच. केवळ अल्पसंख्याक आहेत. अहिंद म्हणजे अल्पसंख्याक, मागासलेले आणि दलित. पण आता दलित तुम्हाला सोडून गेले आहेत. तुमच्यासोबत फक्त अल्पसंख्याक उरले आहेत. सिद्धरामय्या काल रायचूरला का आले कारण त्यांचा राजकुमार रायचूरला येत आहे. माणसे गोळा करण्यासाठी ते आल्याचे त्यांनी सांगितले.
संकल्प यात्रेचे रूपांतर विजय यात्रेत होते. काँग्रेस नेत्यांचे स्वप्न स्वप्नच राहणार आहे. तुम्ही आमच्यावर खोटे आरोप केले तर जनता तुम्हाला जाऊ देणार नाही. काँग्रेसवाल्यांना त्यांची सध्याची स्थिती कायम ठेवण्याचा प्रयत्न करू द्या. रायचूर जिल्ह्यातील ७ पैकी ७ मतदारसंघात आम्ही विजयी होऊ. आम्ही रायचूर जिल्ह्यातूनच विजयी संकल्प सुरू करत आहोत. 2023 पर्यंत राज्यात पुन्हा कमळ फुलवण्याचा संकल्प आम्ही केला आहे. शेतकरी, गरीब, विद्यार्थी यांच्यासाठी आम्ही योजना राबवल्या आहेत. आमच्या सरकारने दूध उत्पादकांना प्रोत्साहनपर रक्कम दिली आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना आम्ही शिष्यवृत्ती देत असल्याची माहिती त्यांनी दिली.
‘बोम्मई आरएसएसची कठपुतळी असल्याच्या सिद्धरामय्या यांच्या आरोपाचा समाचार घेताना बोम्मई म्हणाले, आरएसएस संपूर्ण भारताला एकत्र करत आहे. आरएसएस देशातील दीनदुबळ्यांची सेवा करत आहे. काँग्रेसला आरएसएसबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. समाजवादी पक्षातून आलेल्या सिद्धरामय्या यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या दिवशीच समाजवादी पक्षावर टीकास्त्र सोडले होते असे बोम्मई म्हणाले.
मेळाव्यात माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा, राज्याचे पक्ष प्रभारी अरुणसिंह, मंत्री गोविंद कारजोळ, बी. श्रीरामुलू आणि इतर नेते आणि हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.


Recent Comments