उद्धव ठाकरे गटाला ‘मशाल’ चिन्ह मिळाल्यामुळे ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये महाराष्ट्रासह सीमाभागातील कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष केला जात आहे.
बेळगाव जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश शिरोळ्कर, तालुका प्रमुख सचिन गोरले, तालुका उपप्रमुख पिराजी शिंदे, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती नारायण मूचंडिकर , गणेश आपटेकर, राजू वैजनाथ मूचंडिकर, रामनाथ मूचंडिकर, गजानन काकतीकर, प्रथमेश शिंदे आणि अनेक कार्यकर्त्यांनी आज बेळगावात जल्लोष साजरा केला. पिरनवाडी येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला वंदन करून पुतळ्यासमोर मशाल प्रज्वलित करून घोषणा देत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

मशाल ही संयुक्त महाराष्ट्राचे निशाण आहे, हे चिन्ह शिवसेनेला मिळाल्याने कार्यकर्त्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना बेळगाव शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले म्हणाले शिवसेनेला पूर्वी नोंदणीकृत चिन्ह नव्हते मात्र शिव सेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अखंड महाराष्ट्र निर्मितीसाठी मशाल चिन्हाने सर्वांना प्रेरित केले. अखंड महाराष्ट्र निर्माणासाठी दिशा दाखविली.
केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” हे नाव दिलं आणि मशाल चिन्ह देण्यात आलं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं प्रतीक हे हाती मशाल धरलेलला कामगार आणि शेतकरी असं आहे. उद्धव ठाकरेंना मशाल चिन्ह मिळाल्यानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नवं चिन्ह पोहोचवण्यास त्याचा फायदा होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
शिवसेनेला १९८९ मध्ये धनुष्यबाण चिन्ह मिळालं होतं. त्यापूर्वी शिवसेनेच्या उमेदवारांची नोंद अपक्ष म्हणून व्हायची. १९८५ साली छगन भुजबळ हे मशाल चिन्हावर विधानसभेत विजयी झाले होते. तर, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील सेनेचा पहिला खासदार देखील मशाल चिन्हावर निवडून आला होता. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदार संघात शिवसेना पुरस्कृत मोरेश्वर सावे मशाल चिन्हावर खासदार झाले होते. त्यामुळे नवे निशाण हे शिवसेनेसाठी नक्कीच फायदेशीर आणि बळ देणार ठरेल असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.


Recent Comments