अशी श्री दत्त प्रेमलहरींतील पदे गात, भक्तिभावाने काढण्यात आलेल्या प्रेमध्वज मिरवणुकीने बेळगावात आज श्री पंत महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाला शानदार प्रारंभ झाला.
श्री पंत शके १६८ चा ११७ व्या श्री पंत महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाला भक्तसागराच्या उपस्थितीत आज मंगळवार दि. ११ आश्विन वद्य शके १९४४ रोजी प्रारंभ झाला. सकाळी ८ वाजता समादेवी गल्लीतील श्री पंत वाड्यातून श्री पंत मंदिरात धार्मिक विधी व पंत प्रतिमेचे पूजन करून प्रेमध्वज मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला.
श्री पंत महाराज रचित श्री दत्त प्रेमलहरीतील विविध पदे गात हजारो पंत भक्तांनी या मिरवणुकीत उत्स्फूर्तपणे, श्रद्धेने भाग घेतला.

समादेवी गल्लीतून सुरु झालेली प्रेमध्वज मिरवणूक बेळगाव खडेबाजार व अन्य मार्गांवरून काढण्यात आली. त्यानंतर बेळगावातून श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्रीकडे ही मिरवणूक रवाना झाली. यावेळी सहभागी भक्तांनी श्री पंत महाराज आणि श्री दत्तगुरुंचा एकच जयघोष केला.
श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्री येथील पंत वाड्यात मिरवणूक पोहोचल्यावर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. आजपासून सुरु झालेला श्री पंत महाराज पुण्यतिथी सोहळा गुरुवार दि. १३ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, भजन-कीर्तन, टिपरी सोहळा आदींचे आयोजन करण्यात आले आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे अत्यंत साधेपणाने हा सोहळा साजरा करण्यात आला होता. यंदा कोरोना हटल्याने भव्य प्रमाणात हा सोहळा साजरा करण्यात येत आहे. श्री पंत महाराजांचा बेळगावबरोबरच कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा आदी राज्यात मोठा भक्त संप्रदाय आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणचे एक लाखांहून अधिक भाविक यंदाच्या ३ दिवसीय सोहळ्यात सहभागी होण्याचा अंदाज आहे.
त्यांच्यासाठी अल्पोपहार, भोजन आणि दवाखान्याची व्यवस्था श्री दत्त संस्थान, पंत बाळेकुंद्री यांच्यावतीने करण्यात आली आहे. वायव्य कर्नाटक परिवहन मंडळानेही बेळगावच्या सीबीटी स्थानकापासून दररोज अतिरिक्त ३० बसफेऱ्यांची सेवा सुरु केली आहे. प्रवाशांची संख्या अधिक असेल तर आणखी जादा बस सोडण्याचे नियोजन परिवहन मंडळाने केले आहे.


Recent Comments