Belagavi

बेळगावात शेतकरी हट्टाला पेटले : दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच !

Share

उसाला 5500 रुपये प्रतिटन एफआरपी दर निश्चित करण्याच्या मागणीसाठी बेळगावात शेतकऱ्यांनी आज दुस-या दिवशीही संघर्ष सुरूच ठेवला आहे.

साखर कारखानदारांनी उसाला 3500 प्रति टन दर द्यावा. राज्य सरकारने त्यात दोन हजार रुपयांची भर घालावी आणि उसाला एकूण साडेपाच हजार रुपये द्यावेत, यासाठी राज्य रयत संघटना आणि हरित सेना यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आपले आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच ठेवले आहे.

बेळगावच्या चन्नम्मा सर्कलमध्ये काल सोमवारी रास्ता रोको करून आंदोलन सुरू केलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणी निष्फळ ठरल्याने शेतकऱ्यांनी चोवीस तास ठिय्या आंदोलन केले. त्यांनी काल दुपारी आणि रात्री जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच स्वयंपाक केला आणि डीसी कार्यालयासमोर ठिय्या मांडून आंदोलन सुरूच ठेवले.

आज सकाळी डॉक्टरांनी येऊन आंदोलक शेतकऱ्यांची आरोग्य तपासणी केली. जोपर्यंत मुख्यमंत्री ठोस आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे शेतकऱ्यांनी ठणकावून सांगितले आहे.

Tags:

belgaum farmers 2nd day protest dc office