Belagavi

भ्रष्टाचारमुक्त, स्वच्छ विधानसभेसाठी पदयात्रेचे आयोजन!

Share

निवडणूक जवळ आली कि मतदारांना विविध आमिष दाखवून भुलवण्यात येते. पैसे, वस्तू यासह विविध स्वरूपात मतदारांना भुरळ पाडण्यात येते. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका एमएस्सी एमटेक पदवीधर युवकाने स्वच्छ विधानसभा पदयात्रेच्या माध्यमातून पैशांसाठी आपले मत न विकण्याचे आवाहन केले आहे.

व्हॉइस : नागराज कलगुटकर नामक या तरुणाने स्वच्छ विधानसभेसाठी पदयात्रेचे आयोजन केले आहे. ९ जून पासून बागलकोट जिल्ह्यातून त्याने या अभियानाला सुरुवात केली असून आजतागायत कर्नाटकातील ३१ जिल्ह्यातील २२४ विधानसभा मतदार संघात त्याने भेट देत आहे. पहिल्या टप्प्यात बागलकोट, विजापूर, कलबुर्गी, बिदर, यादगिरी, रायचूर या सहा जिल्ह्यात जनजगृती करून दुसऱ्या टप्प्यासाठी त्याने बेळगावची निवड केली आहे. बेळगावमध्ये 2 दिवस यासंदर्भात मतदारांमध्ये जागृती करून पुढील टप्प्यात बेल्लारी येथे पदयात्रेचे आयोजन त्याने केले आहे.

कर्नाटक राज्यातील जनतेने आपले बहुमोल मत पैशासाठी, कपड्यांसाठी, कुकर किंवा इतर तत्सम वस्तूंसाठी विकू नये, कोणाच्याही आमिषाला बळी न पडता, जाती, धर्माचे राजकारण सोडून लोकशाही मार्गाने मतदान करावे, तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत भ्रष्ट, लाचखोर, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांना मत न देता योग्य उमेदवार निवडावा असे आवाहन या युवकाने केले आहे. २०२३ साली होणाऱ्या निवडणुकीत प्रामाणिक आणि नैतिकदृष्ट्या योग्य असलेल्या उमेदवारासाठी मतदान करावे, भ्रष्ट व्यवस्थेत परिवर्तन करावे, असे आवाहनदेखील या युवकाने केले आहे.

स्वच्छ विधानसभेसाठी सुरु केलेल्या या पदयात्रेच्या माध्यमातून सदर युवक गावोगावी जाऊन जनजागृती करत आहे. या तरुणाने हाती घेतलेली हि मोहीम खरोखरच कौतुकास्पद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचा विचार करून, अभ्यास करून त्यातील महत्वपूर्ण गोष्टींचे अनुसरण करून भ्रष्टाचारमुक्त राज्य आणि देश निर्मितीसाठी सदर युवक आवाहन करत आहे.

Tags:

bagalkot youth election awareness