Belagavi

पंचमसाली आरक्षण जाहीर न केल्यास चन्नम्मा जयंतीवर बहिष्कार

Share

कित्तूर राणी चन्नम्मा जयंतीपूर्वी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावून पंचमसाली समाजाला २ए श्रेणीत आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर न केल्यास संपूर्ण समाज चन्नम्मा जयंती कार्यक्रमावर बहिष्कार टाकेल, असा इशारा कुडलसंगम पिठाचे बसवजय मृत्युंजय स्वामी यांनी सरकारला दिला आहे.

मूडलगी येथे ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आरक्षणप्रश्नी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने आपला समाज लढा देत आहे. मुख्यमंत्री वारंवार आश्वासने देत आहेत. परंतु आश्वासनांची पूर्तता करण्यात येत नाही. शिग्गावि येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्यात आले, सभागृहात आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी मुद्दा उपस्थित केला. यावेळीही मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. आमदार यत्नाळ आणि आमदार लक्ष्मी हेब्बाळकरांनी आरक्षणप्रश्नी कठोर भूमिका मांडली, आंदोलन केले.. यानंतर आठवडाभरात सर्वपक्षीय बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. सभापतींच्या शब्दाचा मान ठेवून आमदारांनी आंदोलन मागे घेतले. मात्र काल झालेल्या बैठकीत केवळ अनुसूचित जाती – जमातीच्या आरक्षणप्रश्नी निर्णय घेण्यात आला.

अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षणप्रश्नी घेतलेला निर्णय स्वागतार्हच आहे. याबद्दल आपण आनंदी आहोत परंतु पंचमसाली समाजाच्या आरक्षणाबाबत होणारी चर्चा कालच्या बैठकीत झाली नाही. सरकारने याप्रश्नी विचार करून सर्वपक्षीय बैठक बोलावून निर्णय घ्यावा, जेणेकरून आंदोलक निश्वास सोडतील. पंचमसाली समाजाला न्याय मिळण्यासाठी हुक्केरी मध्ये २१ ऑक्टोबर रोजी भव्य सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेत विधानसभेला घेराव घालण्यासंदर्भात दिवस ठरविण्यात येणार आहे. याचप्रमाणे २३ ऑक्टोबर रोजी कित्तूर राणी चन्नम्मा जयंती असून यापूर्वी सरकारने निर्णय न घेतल्यास पंचमसाली समाज चन्नम्मा जयंतीवर बहिष्कार टाकेल, असा इशारा त्यांनी दिला

Tags: