Belagavi

लेखिका सुनंदा एम्मी यांच्या साहित्यकृतींचा लोकार्पण सोहळा

Share

कन्नड साहित्य विश्वात महिला लेखिकांचे योगदान मोठे आहे. कन्नड साहित्यात निरक्षर स्त्रियांचे मौखिक साहित्य मोठ्या प्रमाणात असून यासंदर्भात सुनंदा एम्मी यांनी लेख, कथा, कविता, विनोदी कविता आणि इतर शैलीतील साहित्य जगतात आशा निर्माण केली आहे, असे मत डॉ. बाळण्णा शीगीहळ्ळी यांनी व्यक्त केले.

कन्नड साहित्य भवनमध्ये लेखिका सुनंदा एम्मी यांच्या साहित्यकृतींचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी कित्तूर संस्थान रमणे गुरुमने या कन्नड साहित्यकृतीचा परिचय त्यांनी करून दिला. एका गृहिणीने वेगवेगळ्या २८ साहित्यकृती तयार केल्या हि सोपी गोष्ट नसून सुनंदा एम्मी यांची साहित्यनिर्मिती आणि साहित्याची आवड हि अतुलनीय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

कित्तूर राजगुरू संस्थान कलमठचे मडीवाळ राजयोगीन्द्र स्वामी बोलताना म्हणाले, कित्तूर कर्नाटक भागातील महिला साहित्यविश्वात आपले नाव कमावत आहेत हि बाब कौतुकास्पद आहे. कित्तूर कर्नाटकातील चन्नम्मा आणि मल्लम्मा या शूर महिला प्रेरणादायी आहेतच परंतु आधुनिक काळातही महिलांच्या सक्षमीकरणाला बळ देणाऱ्या सुनंदा एम्मी यांच्यासारख्या महिला साहित्यकृतीच्या माध्यमातून बसवेश्वरांच्या तत्वांचे प्रबोधन करून सामाजिक संदेश देत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी सुनंदा एम्मी यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, ग्रामीण भागातील मुली शाळेत गेल्या नसल्या तरी त्यांनी साहित्यविश्वात यश मिळविले आहे. याची माहिती आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. सर्वसामान्यांना अशा स्त्रियांविषयी माहिती नसणे हि खेदजनक बाब असल्याचे त्या म्हणाल्या. या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी आपली पुस्तके वाचावीत असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी लेखिका श्रीमती शैलजा बिंगे आणि श्रीमती रत्नप्रभा बेल्लद यांचा एम्मी कुटुंबीयांतर्फे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास विविध सांस्कृतिक संघ-संस्थांच्या लेखिकांनी एम्मी दाम्पत्याचा सत्कार केला.

यावेळी डॉ. बसवराज जगजंपी, य रु पाटील, नीलगंगा चरंतीमठ, हमिदा देसाई, ए ए सनदी, स रा सुळकुडे, युवा साहित्यिक नदीम सनदी, शंकर बागेवाडी, सुरेश हांजी, एम वाय मेन्सिनकाई, नागेश एम्मी, प्रसाद एम्मी, मनोहर मजलट्टी , ज्योती बादामी, जयश्री निराकारे, डॉ. मैत्रायणी गदीगेप्पगौडर, वासंती मेळेद, जयशीला ब्याकोड आदींसह अनेक साहित्यिक, मान्यवर उपस्थित होते.

Tags:

belgaum kannada sahitya bhavan book release