शेतकऱ्यांनी पिकवलेल्या उसाला 5500 रुपये प्रतिटन भाव द्यावा, या मागणीसाठी येत्या 10 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हसीरू सेनेचे प्रदेशाध्यक्ष चुनप्पा पुजारी यांनी दिली.
कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हसीरू सेनेच्या वतीने बेळगावात आज शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना चुनप्पा पुजारी म्हणाले की, जिल्हाधिकार्यांना सर्व शेतकर्यांच्या वतीने उसाला प्रति टन 5,500 रुपये दर निश्चित करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विनंतीवरून जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली काल शेतकरी नेते आणि साखर कारखानदारांची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीत शेतकऱ्यांना 5,500 रुपये दर निश्चित करण्याची मागणीही करण्यात आली. मात्र, सरकारने आमच्या विनंतीला प्रतिसाद दिलेला नाही. काल जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली झालेली बैठक निष्फळ ठरल्याने 10 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी अशोक सर्कल, किल्ला तलाव ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चाही काढण्यात येणार आहे.
त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनही करण्यात येणार आहे. सरकारने जाहीर केलेला एफआरपी हा फसवा दर आहे. यातून शेतकऱ्यांचे शोषण केले जात आहे. एफआरपी दराबाबत सरकार बोलते हे दुर्दैवी आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आम्ही दहा वर्षे झाली उसाला प्रतिटन 2600 रुपये दर स्वीकारत आहोत. आता सर्वच भाव वाढले आहेत. शेतकऱ्यांच्या उसातून 27 हजार कोटी रुपये सरकारच्या करात जातात. शेतकऱ्यांचा गळा घोटण्याचे काम सरकार करत असल्याचा संताप चुनाप्पा पुजारी यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेला शेतकरी नेते प्रकाश नायक, शिवानंद मुगलीहाळ आदी उपस्थित होते.


Recent Comments