Belagavi

जिल्हा पोलिसांनी केला साहसवीरांचा सन्मान

Share

मलप्रभा नदीत बुडणाऱ्या दोन महिलांचे जीव वाचविणाऱ्या खानापूर आणि पारिश्वाड या गावातील युवकांचा आज जिल्हा पोलिसांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बसवण कुडची या गावातील जिजाबाई कोळूचे या महिलेने खानापूर जवळील मलप्रभा ब्रिजवरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी खानापूरचे युवक विनोद सुतार, श्रीपाद उसिनकर, दर्शन पोळ या युवकांनी या महिलेला वाचविले. याचप्रमाणे ६ ऑक्टोबर रोजी बस्सापूर गावातील ९५ वर्षीय बाळम्मा नागाप्पा नावलगी या वृद्ध महिलेनेही पारीश्वाड येथील मलप्रभा नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी पारीश्वाड येथील युवक ऐजाज मारिहाळ, जुबेर बेपारी या युवकांनी या वृद्ध महिलेचा जीव वाचविला. आणि सदर बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. या युवकांनी दाखविलेल्या साहसाची दखल घेऊन शुक्रवारी बेळगावचे एसपी डॉ. संजीव पाटील यांनी जिल्हा पोलिसांच्या वतीने या युवकांचा सत्कार केला.

यावेळी सत्काराला उत्तर देताना युवकाने सांगितले, पुलाजवळ मासेमारी करत असताना एका महिलेने पाण्यात उडी मारलेली निदर्शनास आली. या महिलेला वाचविण्यासाठी आपण गेल्यानंतर सदर महिलेची मानसिक स्थिती योग्य नसल्याचे समोर आले. हि बाब आम्ही पोलिसांना कळविली. याची दखल घेत पोलिसांनी आपला सत्कार केला. भविष्यात अशी संधी मिळाली तर आम्ही नक्कीच मदत करू असे या युवकाने सांगितले.

आणखी एका महिलेला वाचविणाऱ्या श्रीपाद उसिनकर या युवकाने सत्काराला उत्तर देताना सांगितले, आपण कामानिमित्ताने बाहेर जाताना एका महिलेने पाण्यात उडी मारल्याचे निदर्शनात आले. यावेळी आपल्या मित्रांना बोलावून सदर महिलेला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. हि बाब तातडीने पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनीही सहकार्य केले. आपण केलेल्या कार्याचा सन्मान आज पोलिसांच्यावतीने करण्यात आला, पोलिसांनी आपल्या कार्याची दखल घेतली हि बाब समाधानकारक असल्याचे ते म्हणाले.

यावेळी बोलताना एसपी डॉ. संजीव पाटील म्हणाले, पाण्यात बुडणाऱ्या महिलांचे रक्षण करणारे तरुण हे खरोखरच साहसी आहेत. आईवडिलांनी दिलेल्या चांगल्या संस्कारांमुळे हे शक्य झाले असून अडचणीत असलेल्यांच्या मदतीला धावणे हि बाब आजच्या काळात महत्वपूर्ण असल्याचे ते म्हणाले. अडचणीतील लोकांच्या मदतीला धावण्याऐवजी अनेकजण आज मोबाईलमध्ये व्हिडीओ काढण्यात व्यस्त असतात. मात्र अशा पद्धतीने एखाद्याचा जीव वाचविण्याचे धाडस करणे हे कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.

यावेळी एस पी डॉ. संजीव पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक महानिंग नंदगावी यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते

Tags: