Belagavi

परंपरा जोपासत चव्हाट गल्लीत साजरा झाला हादगा !

Share

आधुनिकीकरणात मागे पडत चाललेल्या परंपरा पुन्हा एकदा रुजत चालल्या आहेत. काळ बदलला, स्त्री रूपे बदलली, असे जरी वाटत असले तरी आजही अनेक स्त्रियांची घालमेल, मानसिक कुचंबणा होतच आहे. अशा या वातावरणात परंपरेच्या माध्यमातून विरंगुळा मिळविण्यासाठी चव्हाट गल्ली येथे पारंपरिक हादगा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात हादग्याची गाणी गात महिलावर्गाने फेर धरला.

आधुनिकीकरणात हरवत चाललेल्या परंपरा पुन्हा एकदा पुनरुज्जीवित होत आहेत. या परंपरांपैकीच एक असलेली हादग्याची परंपरा.. अश्विन महिन्यातील हस्त नक्षत्रापासून साजऱ्या होणाऱ्या या प्रथा महिलावर्गासाठी एक विशेष अशी पर्वणी असते. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून पुढचे सोळा दिवस हा हादगा साजरा केला जातो. मराठी संस्कृतीतील हि परंपरा भोंडला आणि भुलाबाई या नावानेही ओळखली जाते. भरभराट आणि समृद्धीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या हत्तीचे चित्र मध्यभागी ठेवून महिलावर्ग फेर धरतात. मौखिक परंपरेतून चालत आलेल्या गाण्यातून आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचे वर्णन केले जाते. बेळगावमधील चव्हाट गल्ली येथील जालगार मारुती मंदिर येथे महिला मंडळाच्या वतीने संस्कृती जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

पूर्वी हि परंपरा गल्लोगल्ली साजरी केली जायची. नवरात्री ते दिवाळी या दरम्यान हादगा खेळला जायचा. परंतु कालानुरूप हि परंपरा लुप्त होत चालल्याचे दिसून येत आहे. अलीकडे अनेक महिला मंडळांच्या माध्यमातून नवरात्रोत्सवात एखादा दिवस तरी हादगा खेळला जातो. महिला आणि तरुणींच्या माध्यमातून खेळण्यात येणारा मराठी संस्कृतीतील हा पारंपरिक खेळ पुढील पिढीला वारसा म्हणून देण्यासाठी अनेक महिला मंडळाचा प्रयत्न सुरु आहे. मोबाईल, सोशल मीडियाच्या जमान्यात हा वारसा पुढील पिढीला देण्यासाठी चव्हाट गल्ली येथे राबविण्यात आलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे.

चव्हाट गल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शुभांगी मिसाळे, रेणू नायक, प्रेमा पाटील, नीता कदम, विद्या किल्लेकर, नम्रता रेडेकर आदींसह अनेक महिलांनी सहभाग घेतला होता. लुप्त होत चाललेल्या परंपरा अशा पद्धतीने जोपासण्याचा चव्हाट गल्ली येथील महिला मंडळाचा प्रयत्न हा खरोखरच कौतुकास्पद म्हणावा लागेल .

Tags:

chavat galli ladies played hadaga