एकदा जन्म झाला कि प्रत्येकाला जगावेच लागते. त्यामुळे स्वतः जगा आणि दुसऱ्याला जगू द्या हे तत्व प्रत्येकाने अंगिकारले तर जीवन सुखकर होईल, असे मत आमदार गणेश हुक्केरी यांनी व्यक्त केले.

कागवाड तालुक्यातील उगार परिसरातील शतायुषी दि. अलगौड कागे कल्याण मंटप येथे बुधवारी अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य, श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज पादुका दर्शन समारंभात ते बोलत होते. नरेंद्राचार्यांनी देशभर शाखा सुरु करून धर्म आणि अध्यात्माबरोबरच मानवतेची मूल्ये प्रत्येकामध्ये रुजविल्या. प्रत्येकाने जगा आणि जगू द्या हे तत्व आपल्या जीवनात अंगिकारावे असे आवाहन त्यांनी केले.
फलोत्पादन विभागाचे अधिकारी संजय चव्हाण बोलताना म्हणाले, नारदराचार्यांनी केवळ व्याख्यानेच दिली नाहीत तर अडीअडचणीत असलेल्या लोकांची मदत केली. वाईट सवयींमध्ये अडकलेल्यांना मार्गदर्शन करून त्यांना योग्य मार्ग दाखविला. नरेंद्राचार्य यांचे कार्य हे कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.
प्रवचनकार प्रीती परब स्वामी यांनीही अनुभव सांगितले. स्वामीजींनी अध्यात्माबरोबरच समाजसेवा केली असून नरेंद्राचार्य स्वामींची कीर्ती देशातच नाही तर परदेशातही पसरली असल्याचे ते म्हणाले. कोविड काळात रुग्णवाहिका, रुग्णसेवा, मोफत सेवा, मदतनिधी, महापुराची संकट ओढवलेल्या संकटग्रस्तांनासाठी मदत अशा अनेक माध्यमातून त्यांनी समाजाची सेवा केली आहे, त्यांनी दिलेला “तुम्ही जगा, इतरांना जगू द्या” या स्वामीजींच्या तत्वाचे प्रत्येकाने पालन करणे गरजेचे असल्याचे मत प्रीती परब स्वामींनी व्यक्त केले.
यावेळी सकाळी शेकडो सुवासिनी मंगल कलश घेऊन कल्याण मंडपात उपस्थित होत्या. यावेळी पादुका पूजन समाजात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी आमदार गणेश हुक्केरी, माजी आमदार राजू कागे, डॉ. सिद्देगौड कागे, यांनी भक्तांना फळांचे वाटप केले. कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. सिद्देगौड कागे, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष चिदानंद माळी, अन्नसाब भोसले, प्रकाश संकपाळ, बाळकृष्ण सायनेकर, संजय चव्हाण, संजय पाटील आदींसह हजारो भक्तमंडळी उपस्थित होती.


Recent Comments