महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीक्षाभूमीकडे बेळगावमधील अनुयायांनी प्रयाण केले आहे. नागपूरमधील या दीक्षाभूमीत १४ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षायात्रेअंतर्गत बेळगावमधील २६० आंबेडकर अनुयायी नागपूरकडे रवाना झाले आहेत.
समाज कल्याण विभागासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून बेळगावमधील २६० अनुयायी नागपूर दीक्षाभूमीकडे रवाना झाले आहेत. आमदार अनिल बेनके,वि. प. सदस्य साबण्णा तळवार आणि इतर मान्यवरांनी या दीक्षायात्रेचा शुभारंभ केला.(फ्लो)
यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार अनिल बेनके म्हणाले, दीक्षाभूमीवर जाऊन तेथून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेतली पाहिजे. त्यांनी का दीक्षा घेतली? देशासाठी त्यांनी कोणता त्याग केला हि सर्व माहिती प्रत्येक गावोगावी पोहोचविण्याचे काम झाले पाहिजे. डॉ. बाबासाहेबांबद्दल संपूर्ण जगाला आदर असल्याचे आमदार बेनके म्हणाले.
वि. प. सदस्य साबण्णा तळवार बोलताना म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार केवळ आपला समाजच नाही तर संपूर्ण देश आणि जग स्वीकारत आहे. समाजात होणाऱ्या चुकीच्या गोष्टींची जाणीव अनेकांना असते याच चुका दुरुस्त करण्याचे कामही आज सुरु आहे. सर्वांनी एकोप्याने राहून देश आणि संस्कृती वाचवायची आहे. यामुळे सर्वांनी एकसंघ राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
याचप्रमाणे समाज कल्याण विभागाच्या सहसंचालिका उमा सालीगौडर बोलताना म्हणाल्या, दीक्षायात्रा हा शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. शासनाच्या वतीने केएसआरटीसीच्या ऐरावत बसेसची सोय सर्व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या जनतेसाठी करण्यात आली आहे. या अंतर्गत २६० जण दीक्षायात्रेत सहभागी झाले असून दीक्षाभूमी हे पवित्र स्थान असल्याचे त्या म्हणाल्या.
करवेचे राज्य समन्वयक महादेव तळवार म्हणाले, १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला. या पवित्र दिनी बेळगावमधूनही शेकडो अनुयायी दीक्षायात्रेच्या माध्यमातून जात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि त्यांनी दाखविलेला मार्ग हा नक्कीच मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नागपुरातील दीक्षाभूमीला आजवर जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले आहे. संपूर्ण जगासाठी त्याग, शांती आणि मानवतेची प्रेरणा देणाऱ्या दीक्षाभूमीकडे बेळगावमधील आंबेडकर अनुयायीदेखील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या औचित्याने रवाना झाले आहेत.


Recent Comments