कंत्राटी तत्वावर कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना कायमस्वरूपी तत्वावर नेमण्यात यावे, अशी मागणी करत आज सीआरपी तत्वावर कार्यरत असणाऱ्या शिक्षकांनी आंदोलन छेडले.
शनिवारी बेळगाव आणि चिकोडी येथे तात्पुरत्या कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

एमएचआरडीवतीने केंद्र पुरस्कृत सर्व शिक्षण अभियान योजनेनंतर्गत कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या सीआरपी शिक्षकांना कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी, कालावधीचा विचार करण्यात यावा, यासह अनेक मागण्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत.
यावेळी शिक्षक आय बी संपगाव बोलताना म्हणाले, चिकोडी आणि बेळगाव मध्ये सुमारे १५ वर्षांपासून कंत्राटी तत्वावर शिक्षक कार्यरत आहेत. मात्र सरकार आमच्यावर अन्याय करत आहे. मतिमंद आणि कर्णबधिर मुलांच्या शाळेत कार्य करणाऱ्या शिक्षकांना सेवासुरक्षा पुरविण्यात आली आहे. मात्र आपल्याला सेवा सुरक्षा अद्याप देण्यात आली नाही. पाच ते सहा वर्षांपासून स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ११ हजार रुपये पगार आपल्याला देण्यात येत असून २०१९ पासून कंत्राटी तत्वावर आपण कार्य करत आहोत. आपल्या कामाचा मोबदला योग्य पद्धतीने दिला जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी आणखी एका शिक्षकाने बोलताना सांगितले, शिक्षण विभागात गेल्या २० वर्षांपासून कंत्राटी तत्वावर आपण कार्यरत आहोत. मात्र आपल्याला सेवा सुरक्षा पुरविण्यात आली नाही किंवा वेतनवाढ देखील देण्यात आली नाही. आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून राज्यभरात असे ३४७ शिक्षक सेवा बजावीत असल्याचे सांगत आपल्याला कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी ए बी कुरुबर, एन ए होसमनी, ए ए पाटील यांच्यासह अनेक शिक्षक उपस्थित होते.


Recent Comments