संत बसवेश्वर यांनी अनुभव मंडपाच्या नावाची जगातील पहिली संसद स्थापन केली, राणी कित्तूर चन्नम्मानी स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिले, हि बाब आपल्या सर्वांसाठी अभिमानाची असल्याचे मत आमदार अनिल बेनके यांनी व्यक्त केले.
बेळगावमधील कन्नड साहित्य भवन येथे सुरु असलेल्या नाडहब्ब कार्यक्रमात ते बोलत होते. कर्नाटकात अनेक कवी होऊन गेले. राष्ट्रकवी कुवेम्पू, द रा बेंद्रे यांच्यासह अनेक मोठे कवी कर्नाटकातील असून सर्वाधिक पद्मश्री पुरस्कारांचे मानकरी देखील ठरलेले आहेत. कर्नाटकाला जुनी संस्कृती आणि इतिहास असून आजच्या तरुण पिढीने इतिहास जाणून घ्यावा, संस्कृती जतन करावी असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. गुरुदेवी हुलेप्पनवरमठ यांच्याहस्ते कविसंमेलनाचे उदघाटन झाले. या कविसंमेलनात डॉ. हेमावती सोनोळ्ळी, शेषगिरी मुतालिक देसाई, रजनी बेरग्याळ, डॉ. कविता कुसगल, अशोक मळगली, चंद्रशेखर कोप्पद, डॉ. सी. के. जोरापुर आदींसह अनेक कवींनी सहभाग घेतला.

यावेळी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षिका शांतादेवी हुलेप्पनवरमठ, ज्येष्ठ साहित्यिक एल एस शास्त्री, प्रो. बी. एस. गविमठ, डॉ. एफ. व्ही. मानवी यांचा उत्सव समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात गुरुकल्याण नात्यालायाच्या वतीने भरतनाट्यम सादर करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एच बी राजशेखर हे होते. यावेळी उत्सव समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.


Recent Comments