नवरात्रोत्सवानिमित्ताने सर्वत्र विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरु असून या सणाचे तरुणाईमध्ये आकर्षण असलेल्या दांडियाचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात येत आहे. बेळगावमधील एसजीबीआयटी महाविद्यालयात देखील दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत दांडियाचा आनंद लुटला.
नवरात्रोत्सवात सर्वत्र भक्तिपूर्ण वातावरण पहायला मिळते. अशातच विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येते. याच धर्तीवर बेळगावमधील श्री सिद्धरामेश्वर शैक्षणिक संस्थेच्या एस. जी. बाळेकुंद्री अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वुमन एम्पॉवरमेंट युनिटतर्फे गुरुवारी सायंकाळी विद्यार्थिनींसाठी दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थिनींनी विविध गाण्यांवर नृत्य केले. दैनंदिन क्लास आणि परीक्षांच्या दडपणाखाली आलेल्या विद्यार्थिनींनी सर्व चिंता बाजूला ठेवून दांडियामध्ये सहभाग घेत मनसोक्त आनंद लुटला.
यावेळी प्रा. शैलजा माळी बोलताना म्हणाल्या, वुमन एम्पॉवरमेंट युनिटच्या अंतर्गत विद्यार्थीनींसाठी दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी नवरात्रोत्सवानिमित्त महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याचसोबत विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देखील देण्यात येते. यंदा आयोजित केलेल्या कार्यक्रमात ३०० हुन अधिक विद्यार्थिनींनी सहभाग घेतला असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी या महाविद्यालयात शिकणाऱ्या पल्लवी निंबरगी या विद्यार्थिनीने बोलताना सांगितले, महाविद्यालयातील विद्यार्थीनींसाठी दांडिया नाईटचे आयोजन करण्यात आले आहे. आम्ही साऱ्या जणींनीं अत्यंत उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग घेऊन दांडियाचा आनंद लुटला असल्याचे या विद्यार्थिनीने सांगितले
एसजीबीआयटी महाविद्यालयात नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या दांडिया नाईटचा विद्यार्थिनींनी मनमुराद आनंद लुटला. शिवाय विद्यार्थिनींसोबत प्राध्यापिकांनीही ठेका धरला.


Recent Comments