Belagavi

रिअल इस्टेट एजंटचा खून कुटुंबीयांकडूनच !

Share

बेळगाव कॅम्प येथील रिअल इस्टेट एजंट सुधीर कांबळे खून प्रकरणाला मोठे वेगळे वळण मिळाले आहे. त्याच्या खुनात कुटुंबीयांचाच हात असल्याचे स्पष्ट झालेआहे. त्याची हत्या करून नाट्य रचणाऱ्या सुधीरची पत्नी, मुलगी आणि तिच्या मित्राचा कॅम्प पोलिसांनी भांडाफोड केला आहे.

होय, 17 सप्टेंबर रोजी मध्यरात्री कॅम्पमधील फिश मार्केटजवळील घरात रिअल इस्टेट एजंट सुधीर भगवानदास कांबळे याची हत्या करण्यात आली होती. खून झालेल्या व्यक्तीची पत्नी आणि मुलीने ही हत्या कशी झाली? खून कोणी केला? याबाबत माहिती नसल्याची बतावणी केली. याप्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून कॅम्प पोलिसांनी तपासाला गती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खडेबाजारचे एसीपी चंद्रप्पा आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास हाती घेतला. पोलिसांच्या तपासात खून झालेला सुधीर हा पत्नी आणि मुलीचा छळ करत होता, तो हवे तसे पैसे उधळत असे. शिवाय त्याला दारूचे व्यसनही होते असे सांगितले जाते. तसेच, तो रोज घरी भांडत असे. हे सहन न झाल्याने पत्नी रोहिणी, मुलगी स्नेहा आणि पुण्यातील अक्षय महादेव विटकर यांनी मिळून सुधीरची हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

या प्रकरणाचा छडा लावल्याबद्दल शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी कॅम्प पोलिसांचे अभिनंदन केले आहे. स्नेहा पुण्यात अभ्यासक्रम शिकण्यासाठी गेली असताना आरोपी अक्षय विटकर याच्याशी परिचय झाला. स्नेहाच्या माध्यमातून तो तिच्या आईलाही भेटला. सुधीर घरी रोज भांडतो, छळ करतो, त्याचा काटा काढला पाहिजे अशी तिघांची चर्चा झाली. त्यातून काही कल्पना वापरून सिनेस्टाईलने, एखादा चित्रपट पाहून त्यातील आयडिया घेऊन त्यांनी हा कट रचला. त्यासाठी आरोपी अक्षयला पुण्याहून बेळगावला आणून एका लॉजमध्ये ठेवले होते. 17 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा घरी बोलावून सुधीरचा काटा काढण्यात आला. यानंतर आरोपी पुन्हा लॉजवर गेला. सकाळी सुधीरचा खून कसा झाला, ते माहीत नाही, असा बहाणा त्यांनी केला. आमच्या पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून तीन आरोपींना अटक केली आहे असे शहर पोलीस आयुक्त बोरलिंगय्या यांनी सांगितले.

या कांबळे कुटुंबात मुलीच्या प्रश्नासह अनेक मुद्द्यांवरून संवादाचे अंतर होते. कुटुंबीय काय करतात, कोणाशी बोलतात, ते प्रश्न विचारतात. वैयक्तिक बाबींवरून अधिक त्रास होत असल्याने आरोपींनी हत्येचा निर्णय घेतला होता. हत्येसाठी वापरलेला चाकू जप्त केला आहे. शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी पुढील तपास कॅम्प पोलीस करत असल्याची माहिती दिली.

एकंदर घटनाक्रम पाहता, यातून काय साध्य झाले? असाच प्रश्न निर्माण होतो. मतभेद टाळून सुखाने संसार करायचा सोडून क्षुल्लक कारणावरून कुटुंबप्रमुखाचा जीव घेण्यापर्यंत आरोपींनी मजल मारली ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. त्याबद्दल त्यांना आता तुरुंगाची हवा खावी लागली आहे.

Tags:

belgaum murder murder real estate agent murder three arrest