Belagavi

दुर्गामाता दौडमुळे छत्रपती शिवाजीनगर परिसरात चैतन्य

Share

नवरात्रौत्सवानिमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे बेळगावात आज तिसऱ्या दिवशीची दुर्गामाता दौड काढण्यात आली. दौडीमुळे शिवाजीनगर परिसरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.


देव, देश आणि धर्माच्या रक्षणाचा वसा घेऊन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे बेळगावात गेली अनेक वर्षे नवरात्रात दुर्गामाता दौड काढण्यात येते. गेली दोन-तीन वर्षे कोरोनामुळे मर्यादित प्रमाणात दौड काढण्यात आली होती. मात्र आता कोरोनाचे सावंत दूर झाल्याने शेकडो धारकऱ्यांच्या सहभागाने भव्य प्रमाणात दुर्गामाता दौड काढण्यात येत आहे. यंदाच्या दौडला गेल्या दोन दिवसांपासून प्रारंभ झाला आहे. आज तिसऱ्या दिवशी शहराच्या शिवाजीनगर परिसरात दौड काढण्यात आली. प्रेरणामंत्र पठण व ध्वजारोहण करून दौड सुरु करण्यात आली. भारतमाता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय श्री राम अशा घोषणा देत सळसळत्या उत्साहाने युवक-युवती आणि अगदी लहान मुले-मुलीही पांढरे शुभ्र कपडे, टोप्या, भगवे फेटे परिधान करून दौडमध्ये सहभागी झाले होते. गल्लोगल्ली बालशिवाजी, जिजामातेच्या वेशात छोट्या मुलांनी दौडची शान वाढवली.


दौडमध्ये सहभागी झालेल्या वैष्णवी धामणेकर या मुलीने दुर्गामाता दौडमुळे छत्रपती शिवरायांचा तेजस्वी इतिहास नव्या पिढीला कळण्यास, आपली संस्कृती आणि धर्म समजून घेण्यास मदत होते असे सांगितले.
शिवाजीनगर तिसरी गल्ली येथील कल्पना संजय मोतेकर व अन्य महिलांनी सांगितले की, आम्ही पहाटे ४. पासूनच दौडच्या स्वागतासाठी तयारी करत आहोत. कोरोनामुळे दोन वर्षे मर्यादित प्रमाणात दौड काढण्यात आल्याने आम्हाला सहभागाचा आनंद लुटता आला नाही. परंतु यंदा भव्य प्रमाणात दुर्गामाता दौड काढण्यात येत आहे. आम्ही उत्साहाने यात सहभागी झालो असून, यापुढेही दरवर्षी सहभागी होणार आहोत असे त्यांनी सांगितले. बाईट + बाईट
दरम्यान, दौडच्या मार्गावर महिलांनी सुबक रांगोळ्या रेखाटल्या होत्या. त्याशिवाय अनेक महिलांनी आरती ओवाळून ध्वज आणि दौडचे स्वागत केले. रस्त्याच्या दुतर्फा इमारतीच्या बाल्कनीतून, दरवाजातून दौडवर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. शिवाजी महाराजांचे पोवाडे आणि वीररसयुक्त गाणी लावण्यात आल्याने वातावरण शिवमय झाले होते.

Tags:

belgaum shri durgamata doud chatrapati shivaji nagar