Belagavi

गोवा सरकारने घातली अवजड वाहनांवर बंदी ; चोर्ला घाटात वाहतूक कोंडी

Share

बेळगावचा भाजीपाला गोव्यात येण्यापासून रोखण्याचा निर्णय घेतलेल्या गोवा सरकारने गोव्यात चोर्ला मार्गे येणाऱ्या अवजड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा आदेश जारी केला असून याबाबत राज्यातील लॉरी मालक व चालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

चोर्लामार्गे गोव्याकडे जाणाऱ्या लॉरी थांबवण्यात आल्याने आज चोर्ला घाटात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने गोवा राज्यात अवजड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. उत्तर गोवा ट्रॅफिक एसपींच्या विनंतीवरून उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केला आहे. २१ सप्टेंबर रोजी एक अधिसूचना जारी करून गोवा राज्यात येणाऱ्या लॉरींच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर चोर्ला घाटातून अवजड वाहनांना गोव्यात प्रवेश दिला जात नाही. गोव्याला जोडणारा रामनगर गोवा रस्ता गेल्या तीन वर्षांपासून बंद असून या पार्श्वभूमीवर चोर्ला घाटातून जाणार्या व्यावसायिक लॉरी आता केरी-बेळगाव राज्य महामार्ग १ मार्गावरून जात असून या मार्गावर लॉरीच्या रांगा लागल्या आहेत. १९ मार्च २०२३ पर्यंत अवजड लॉरींच्या वाहतुकीवर बंदी असल्याने ज्या लॉरी चोर्ला मार्गे गोव्याकडे जात होत्या त्या आता गोवा सीमेवर उभ्या आहेत. रामनगरमार्गे गोव्याकडे जाणारा रस्ता दुरुस्त होईपर्यंत या मार्गावरून वाहतूक व्यवस्था करण्याची मागणी लॉरी मालकांनी केली आहे.

कारवारमार्गे गोव्याला जाण्यासाठी २५० किलोमीटर पल्ला पार करावा लागतो. मात्र आपल्याला तितके भाडे मिळत नसल्याचे एका लॉरी मालकाने सांगितले. खाद्यपदार्थ, बांधकाम साहित्यासह विविध वस्तूंची वाहतूक करणाऱ्या लॉरी चोर्ला मार्गावर थांबल्या असून उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेवर रोखण्यात आलेल्या बेळगावातील लॉरी मालकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.

गोवा सरकार ज्या पद्धतीने निर्णय घेत आहे याचा मोठा फटका गोवा राज्याला बसणार यात शंका नाही. बेळगावमधील लॉरी चालकांना निर्माण झालेली समस्या तातडीने सोडविण्यासाठी प्रशासनाने जागे होणेही गरजेचे आहे.

Tags: