त्या तरुणाला शिक्षणाची आवड आहे. आपल्या गावी कॉलेज सुरू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना त्याने पत्र लिहिले होते. ते ही साध्या पेनने नव्हे तर स्वतःच्या रक्ताने ! त्याच्या या अनोख्या प्रयत्नांना आता यश आले आहे. आता सततच्या प्रयत्नांमुळे त्याच्या शहरात पदवीपूर्व महाविद्यालय मंजूर झाले आहे. पाहुयात या तरुणाच्या संघर्षाची यशोगाथा !
होय… आपल्या गावात सरकारी कॉलेज सुरु व्हावे ही एका स्थानिक शिक्षणप्रेमी तरुणाची प्रबळ इच्छा होती. त्यापोटी त्याने पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांसह अनेकांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिले होते, मुद्देबिहाळ तालुक्यातील नलतवाड शहरात सरकारी प्री-डिग्री कॉलेज सुरू करण्याची त्याची इच्छा अखेर पूर्ण झाली आहे.
राज्य सरकारने महाविद्यालय सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. विजयरंजन जोशी असे त्या ध्येयवेड्या शिक्षणप्रेमी तरुणाचे नाव असून, तो विजापूर जिल्ह्यातील नलतवाडचा रहिवासी आहे. त्याच्या सततच्या प्रयत्नानंतर शहरात पदवीपूर्व कॉलेज सुरू करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. याशिवाय राज्यातील एकूण 46 पदवीपूर्व महाविद्यालयांना शासनाने मंजुरी दिली आहे.
तसे पाहता विजयरंजनचा हा रक्तमय पत्र व्यवहार गेल्या पाच वर्षांपासून सुरु आहे. पाच वर्षांपूर्वी 2017मध्ये तत्कालीन आमदार सी. एस. नाडगौडा, जिल्हाधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी यांना पत्र लिहून हायस्कूल, पीयू, पदवी महाविद्यालयासाठी विनंती केली होती. नंतर पुन्हा सहा महिन्यानी या सर्वांना आवाहन केले होते. मात्र त्यातून काहीच हाती न लागल्याने 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्ताने पत्र लिहून विनंती केल्यानंतर सहा महिन्यांनी पंतप्रधान कार्यालयातून महाविद्यालय सुरू करण्याचे आश्वासन देणारे पत्र आले आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्याची तपासणी केली जाईल, असे उत्तर आले. खासगी शाळांचा डोनेशनचा बोजा टाळण्यासाठी आणि गरीब मुलांच्या भविष्यातील शिक्षणासाठी काहीतरी केले पाहिजे, या उद्देशाने त्यांनी पत्रव्यवहार सुरू केला. जेव्हा त्याची कोणी दखल घेईनासे झाले, तेव्हा मग त्याने चक्क रक्ताने 10 पानी पत्र लिहून आवाहन केले, परंतु कोरोनामुळे कॉलेज सुरू होण्यास उशीर झाला. अखेर आता शासनाने महाविद्यालय सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे विजयरंजनला आनंद झाला आहे.
आपल्या मुलांसाठी कॉलेज मंजूर झाल्यामुळे आता पालकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या मुलांना कॉलेज शिक्षणासाठी खूप त्रास सहन करावा लागत होता. अखेर नलतवाड शहराला पदवीपूर्व महाविद्यालय मंजूर झाले आहे. विजयरंजनच्या संघर्षाचा विजय होऊन, आमच्या नलतवाड गावात कॉलेज सुरू झाल्यामुळे आमच्या मुलांना आमच्या गावातच शिकता येईल असा आनंद स्थानिकांनी व्यक्त केला.
खासगी महाविद्यालयांच्या देणगीचा आणि गरीब वर्गातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी स्वत:च्या रक्ताने पत्र लिहिणाऱ्या या तरुणाला सलाम !
Recent Comments