Khanapur

खानापूर आमदारांना धमकीवजा इशारा देणारा व्हिडीओ!

Share

गेल्या ८ महिन्यांपूर्वी पडलेल्या घराची अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्याने खानापूर तालुक्यातील कक्केरी या गावातील एका तरुणाने आमदारांना धमकीवजा इशारा देणारा व्हिडीओ जारी करत आत्महत्येचा इशारा दिलाय.

 

खानापूर तालुक्यातील कक्केरी गावातील एका कुटुंबाचे घर कोसळून ८ महिने उलटून गेले आहेत. ८ महिन्यानंतर देखील सदर कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यात आली नाही. याप्रश्नी खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर यांना विचारण्यात आले असता सरकारने अनुदान दिले नसल्याचे कारण त्यांनी पुढे केले आहे. यामुळे सदर कुटुंबातील संतप्त तरुणाने आपल्याला घरासाठी नुकसान भरपाई मिळावी यासाठी एक व्हिडीओ जारी केला आहे.

 

या व्हिडिओत या तरुणाने म्हटले आहे कि, अतिवृष्टीमुळे आपले घर कोसळून ८ महिने उलटून गेले आहेत. यासंदर्भात तहसीलदार, जिल्हाधिकारी, लोकायुक्त आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. यासंदर्भात या भागाच्या आमदार अंजली निंबाळकर यांनाही पत्र लिहिण्यात आले आहे. याबाबत दूरध्वनीवरून आमदारांना विचारण्यात आले असता सरकार अनुदान देत नसल्यामुळे आपण कुठून भरपाई देणार असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

आमदार अंजली निंबाळकरांना आमच्या कुटुंबीयांनी मतदान केले. जर गरीब कुटुंबाला न्याय देता येत नसेल तर तुमचा आमदार म्हणून उपयोग काय? असा सवाल या तरुणाने उपस्थित केलाय. माझ्या घरासाठी नुकसान भरपाई न मिळाल्यास आपण आत्महत्या करू असा इशारा या तरुणाने या व्हिडिओच्या माध्यमातून दिला आहे.

 

सदर तरुणाने आपली व्यथा या व्हिडिओच्या माध्यमातून मांडली असून या तरुणाच्या व्यथेला प्रशासन आणि आमदार कशापद्धतीने प्रतिसाद देतील हे पाहणे महत्वाचे आहे. सदर व्हिडीओ आज दिवसभर वेगाने वायरल झाला आहे.

Tags:

POLITICS