Hukkeri

ग्रामीण वीज संघ देणार ऑनलाइन बिलभरणा सुविधा

Share

राज्यातील सहकार तत्त्वावरील, ग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या एकमेव हुक्केरी ग्रामीण विद्युत सहकारी संघाने गेल्या वर्षभरात वीज विक्री, ग्राहकांची बिले, बँकेचे व्याज आणि इतर स्रोतांमधून नफा कमवून प्रगती साधली आहे असे संचालक अशोक चंदाप्पगोळ यांनी सांगितले.


येथील संघाच्या कार्यालयात गुरुवारी आयोजित बैठकीत बोलताना संचालक अशोक चंदाप्पगोळ म्हणाले की, संघाचे उत्पन्न 233 कोटी 85 लाख रुपये आहे. यात वीज खरेदी, लाइन पर्यवेक्षण, कर्मचारी खर्च, प्रशासकीय आणि इतर खर्च याचा समावेश आहे.

उत्पन्न आणि खर्चाची तुलना केल्यास संघाची आठ कोटी रुपयांची बचत होणार आहे. संघाचे 92796 ग्राहक सदस्य आहेत आणि 329 कायमस्वरूपी आणि तात्पुरते कर्मचारी कार्यरत आहेत. चालू वर्षात 186 कोटी 20 लाख रुपयांची वीज खरेदी करण्यात आली असून 184 कोटी 3 लाख रुपयांची वीज विकली गेली आहे. वीजपुरवठा, दुरुस्ती व देखभालीसाठी 10 कोटी 91 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

110 किमी एचटी लाईन, 141 किमी एलटी लाईन, 123 ट्रान्सफॉर्मर स्टेशन, 1335 सिंचन पंपसेट, 30 छोटे उद्योग, 4 एचटी वीज जोडण्या, 3975 घरे आणि उद्योग व्यवसायांना येत्या काही दिवसांत जोडणी देण्याचे तसेच ऑनलाइनच्या माध्यमातून वीज बिले भरण्याची सोय उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे असे त्यांनी सांगितले.

संघाचे अध्यक्ष कलगौडा पाटील, उपाध्यक्ष विष्णू रेडेकर, संचालक पृथ्वी कत्ती, शशिराज पाटील, के. के. बेनचनमरडी, कुणाल गौडा पाटील, रमेश कुलकर्णी, बसगौडा मगेन्नवर, रवींद्र हिडकल, रवींद्र असोदे, बी. सी. पटोळी, आय. आर. बंदिराज, संगीता दप्यादोळी, शिवलीला मनगुत्ती आदी उपस्थित होते.

Tags: