Belagavi

शासकीय म. वाल्मिकी जयंतीवर बहिष्काराचा निर्णय : राजशेखर तळवार

Share

अनुसूचित जाती-जमातींना अतिरिक्त आरक्षण देण्यात दिरंगाई करत असलेल्या सरकारचा निषेध करत ९ ऑक्टोबर रोजी शासनाच्या वतीने होणाऱ्या महर्षी वाल्मिकी जयंती कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वाल्मिकी समाजाचे नेते राजशेखर तळवार यांनी दिली.

 

कर्नाटक राज्य अनुसूचित जाती-जमाती अतिरिक्त आरक्षण संघर्ष कृती समितीने शनिवारी बेळगावमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत वाल्मिकी समाजाचे नेते राजशेखर तळवार बोलताना म्हणाले, वाल्मिकी समाजाला अतिरिक्त आरक्षण मिळावे यासाठी बेंगळुरू येथील फ्रिडम पार्क मध्ये प्रसन्नानंदपुरी महाराजांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करत आहेत.

आरक्षणप्रश्नी निवृत्त न्यायमूर्ती नागमोहनदास समितीने सरकारला अहवाल दिला आहे. या अहवालात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना शिक्षण आणि नोकरीत अतिरिक्त आरक्षण देण्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र आजतागायत अनेकवेळा सरकारने केवळ खोटी आश्वासने देत आपल्या समाजाची फसवणूक केली आहे.

मुख्यमंत्र्यांनीही दिलेला शब्द पाळला नाही. यामुळे येत्या ९ ऑक्टोबर रोजी शासकीय पातळीवर साजऱ्या होणाऱ्या महर्षी वाल्मिकी जयंतीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आरक्षणप्रश्नी सरकारच्या दिरंगाईच्या धोरणावर तसेच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सरकारविरोधात वाल्मिकी समाजाने शासकीय पातळीवर होणाऱ्या जयंती कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ९ ऑक्टोबर रोजी संपूर्ण जिल्ह्यातील वाल्मिकी समाज बेंगळुरू येथील फ्रिडम पार्क येथे जाऊन आंदोलनात सहभाग घेणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

 

या पत्रकार परिषदेला वाल्मिकी समाजातील नेते उपस्थित होते.

Tags: