बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाचा मुद्दा वारंवार पुढे येत असून आता सौंदत्ती यल्लम्मा रेणुका देवीकडे पत्राद्वारे एका भक्ताने विभाजनासाठी साकडे घातले आहे.
सौंदत्ती यल्लम्मा रेणुका देवीला यंदा अनेक पद्धतीची पत्रे लिहिली गेली आहेत. चित्रविचित्र मागण्या करणाऱ्या पत्रांमध्ये बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनासाठी चार पानांचे लांबलचक पत्र लिहिण्यात आले आहे. या पत्रात बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाची बुद्धि मुख्यमंत्र्यांना देवो अशा आशयाचे पत्र लिहिण्यात आले आहे.
बेळगाव, गोकाक, चिकोडी, बैलहोंगल अशा चार जिल्ह्यात विभाजन व्हावे, अशी मागणी करणारे पत्र दानपेटीत टाकण्यात आले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री के एच पटेल यांच्या कार्यकाळात १० तालुके होते. १९९७ मध्ये बेळगाव, चिकोडी, गोकाक सह तीन भागात विभागणी करण्याचे घोषित करण्यात आले होते. आता १४ तालुके झाले असून या तालुक्यांची चार जिल्ह्यात विभागणी करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे. यादगिरी, कोडगुप्रमाणे बेळगाव जिल्ह्यात १४ तालुके आणि १८ विधानसभा मतदारसंघ असून त्याची चार जिल्ह्यांमध्ये विभागणी करावी,
चार जिल्हे व दोन स्वतंत्र उपविभागीय कार्यालये करावीत. अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
गेल्या पाच दिवसांपासून सौंदत्ती यल्लम्मा देवीच्या दानपेटीत आलेल्या देणगीची मोजणी सुरु असून या दानपेटीत अनेक चित्रविचित्र पद्धतीच्या मागणीची पत्रे सापडली आहेत. याशिवाय विविध चित्रे, अरब देशाचे चलन यासह अनेक गोष्टी दानपेटीच्या माध्यमातून देवस्थानाकडे आल्या आहेत. मात्र बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी करणारे पत्र मिळाल्याने पुन्हा जिल्ह्याच्या विभाजनासंदर्भात उत्सुकता वाढली आहे.


Recent Comments