नवरात्रोत्सव आणि दसरा सणाची क्षणगणना आता सुरू झाली आहे. दांडिया खेळताना कोणी कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा कडक इशारा बेळगावच्या मार्केट स्टेशनचे सीपीआय मल्लिकार्जुन तुळसीगेरी यांनी दिलाय.
दसरा सणानिमित्त मार्केट पोलिस स्टेशन आवारात आज गुरुवारी शांततासभा घेण्यात आली. यावेळी बोलताना सीपीआय मल्लिकार्जुन तुळसीगेरी यांनी दसरा सण निर्विघ्नपणे पार पाडण्याचे आवाहन केले. दांडिया उत्सवात रात्री 10 नंतर लाऊडस्पीकर लावू दिले जाणार नाहीत. निवासी भागातील घरांच्या रस्त्यावर दांडिया खेळताना आवाज कमी ठेवावा. लोकांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी आयोजकांनी व्यवस्था करावी. दांडियात मुली आणि लहान मुले सहभागी होणार आहेत. त्यावेळी स्वयंसेवकांनी उभे राहून त्यांचे संरक्षण केले पाहिजे. आम्ही आमचे काम करत आहोत. पण सर्वकाही आमच्यावर टाकू नका. आयोजकांनाही जबाबदारीही घ्यावी लागेल. मुलींची छेड काढणाऱ्या तरुणांना तुम्ही कडक नोटीस द्या. अन्यथा कठोर कारवाई करावी लागेल. तसेच युवकांनी एका परिसरातून दुसऱ्या भागात जाऊ नये, असे निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीला पीएसआय विठ्ठल, पीएसआय हुसेन, पीएसआय कुरेर व इतर कर्मचारी व दांडिया आयोजक उपस्थित होते.


Recent Comments