Belagavi

बैलहोंगलमधील भाजप नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ

Share

: भाजप उमेदवारीवरून बैलहोंगल मतदार संघात दोन उमेदवारांमध्ये मोठी रस्सीखेच सुरु असल्याचे निदर्शनात आले आहे. बी एस येडियुरप्पा यांच्या बैलहोंगल दौऱ्यादरम्यान हा प्रकार समोर आला आहे.

बैलहोंगल विधानसभा मतदार संघात भाजप – केजीपी युद्धाला अजून सुरुवात झाली नाही. मात्र भाजप उमेदवारीसाठी इच्छुक असलेले जगदीश मेटगुड आणि डॉ. विश्वनाथ पाटील या दोघांमध्ये मात्र रस्सीखेच सुरु झाल्याचे दिसून येत आहे. २०१३ साली विधानसभा निवडणुकीत डॉ. विश्वनाथ पाटील यांनी केजीपी मधून निवडणूक लढवून विजय मिळविला होता. तर २०१३ साली भाजपमधून निवडणूक लढविल्या जगदीश मेटगुड यांचा पराभव झाला होता. २०१८ साली झालेल्या निवडणुकीत डॉ. विश्वनाथ पाटील यांना भाजपमधून उमेदवारी देण्यात आली. मात्र यावेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेल्या जगदीश मेटगुड यांनी भाजपचा पराभव केला. आता पुन्हा २०२३ सालच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळविण्यासाठी उभयतांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे.

माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी नुकतीच बैलहोंगल मतदार संघाला भेट दिली. तेली समाज आणि कर्मचारी मेळाव्यासाठी बैलहोंगलमध्ये गेलेल्या येडियुरप्पा यांनी जगदीश मेटगुड यांच्या निवासस्थानी भेट दिली. माजी आमदार जगदीश मेटगुड यांच्याघरी सकाळचा नाश्ता आणि त्यानंतर विश्वनाथ पाटील यांच्या घरी दुपारचे जेवण घेऊन दोन्ही नेते आपल्यासाठी महत्वाचे असल्याचा एक संदेशही दिला. विश्वनाथ पाटील आणि जगदीश मेटगुड या दोघांच्या भांडणात २०१८ साली काँग्रेसचे उमेदवार महांतेश कौजलगी यांचा विजय झाला.

आता पुन्हा २०२३ सालच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असून आतापासूनच इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. जगदीश मेटगुड आणि विश्वनाथ पाटील यांच्यात पुन्हा अंतर्गत चढाओढ सुरु झाली असून आगामी निवडणुकीत कोण वरचढ ठरणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

Tags: