Banglore

विधानसभेतही गाजला पंचमसाली आरक्षणाचा मुद्दा

Share

पंचमसाली समाजासाठी 2-ए आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हावेरी जिल्ह्यातील शिग्गावी येथे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या निवासस्थानाजवळ धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. विधानसभेतही आज पंचमसाली समाजाला 2-ए सह इतर समाजाना आरक्षण देण्याचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला.

होय, भाजपचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी विधानसभेत आज शून्य प्रहरात लिंगायत पंचमसाली समाजाला 2ए आरक्षणासह प्रवर्ग 1, एसटी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी उत्तर दिले की, हा शून्य प्रहरात मांडण्याचा विषय नाही. आरक्षणात कोणतीही वाढ करण्याबाबत कायदा आहे. कर्नाटकात आधीच ५० टक्के आरक्षण पूर्ण झाले आहे. आरक्षण ही शोषित आणि आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्यांना दिलेली गोष्ट आहे. दोन समित्यांच्या शिफारशी आमच्यासमोर आहेत. सर्वांच्या विचाराने याबाबत पुढे जावे लागेल. एका समाजाला आरक्षण देताना दुसऱ्या समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आम्ही ते हाताळू. सगळ्यांनी एकत्र बसून विचाराने तोडगा काढला पाहिजे. समाजाच्या विविध मागण्या शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण केल्या तर त्या कायदेशीर राहतात. मागासवर्गीयांचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री बोम्मई यांच्या उत्तरानंतर, बसनगौडा पाटील यत्नाळ यांना बोलू न देता सभापतींनी पेपर सादर करण्यास परवानगी दिली. तेव्हा विरोधी काँग्रेसच्या आमदारांनी यत्नाळ यांच्या बाजूने उभे राहून त्यांना बोलू देण्याची मागणी केली. भाजपचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी सभापतींसमोरच्या हौद्यामध्ये जाऊन बोलण्याची परवानगी मागितली. काँग्रेसच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी यत्नाळ यांना पाठिंबा दिला. त्यावर, तुम्ही एकटे आला नाहीत, सोबत लक्ष्मीला घेऊन आलात, अशी विनोदी टिपणी सभापतींनी केली. दरम्यान, या मुद्यावर विधानसभेत चर्चा व्हावी, अशी मागणी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली.

Tags: