Belagavi

रामदुर्ग खून प्रकरणाचा 24 तासात छडा; पत्नीनेच प्रियकरासह काढला पतीचा काटा!

Share

रामदुर्गातील होसूर पुलाजवळील खुनाचा अवघ्या 24 तासात छडा लावण्यात रामदुर्ग पोलिसांना यश आले आहे. प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढलेल्या पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

रामादुर्ग तालुक्यातील कटकोळ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी निष्ठुर पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकत एका गंभीर खून प्रकरणाचा छडा 24 तासांत लावण्यात यश मिळवले आहे. पत्नीनेच तिच्या प्रियकरासह पतीची हत्या करून त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे भासविण्याचा प्रयत्न या घटनेत केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा करून कटकोळ पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराची कसून चौकशी करून हा प्रकार उघडकीस आणला. आता पत्नी आणि तिचा प्रियकर पोलिसांचे पाहुणे बनले आहेत.

रामदुर्ग तालुक्यातील होसूर तलावाजवळ काल 35 वर्षीय पांडप्पा जटकन्नावर याचा मृतदेह आढळून आला होता. आज सकाळपर्यंत पोलिसांनी या हत्येला जबाबदार असलेल्या आरोपींना अटक केली आहे. कटकोळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास करून 24 तासांत या प्रकरणाचा छडा लावला. पती-पत्नीच्या भांडणात पांडप्पाची पत्नी लक्ष्मीने पांडप्पाला शेतीच्या अवजाराने मारले. प्रियकर रमेश बडिगेरसोबत पतीची हत्या करणारी पत्नी लक्ष्मीने नंतर पांडप्पाच्याच दुचाकीवरून त्याचा मृतदेह नेला आणि अपघात झाल्याचे भासवून मृतदेह होसूर पुलाजवळ फेकून दिला.

पांडप्पाची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्यावर लक्ष्मी, तिला काही माहित नसल्यासारखी घरी गेली आणि तिचा नवरा दुसऱ्या दिवशी घरी परतला नाही असे भासवले. संशयावरून पोलिसांनी तिची चौकशी केली असता सत्य समोर आले. त्यानंतर लक्ष्मीसह तिचा प्रियकर रमेश बडिगेर याला अटक करण्यात आली आहे. होसूर गावातील रमेश बडिगेर याच्यासोबत लक्ष्मी जटकन्नावरचे विवाहबाह्य अनैतिक संबंध होते. हे कळताच लक्ष्मीचा पती संतापला. याच कारणावरून पांडप्पा आणि लक्ष्मी यांच्यात वारंवार भांडणे होत होती. खुनाच्या रात्रीही पांडप्पा व लक्ष्मीचे भांडण झाले. याची माहिती लक्ष्मीने प्रियकर रमेश याला दिली. त्यानंतर या दोघांनी पांडप्पाच्या हत्येचा कट रचला. त्या ठिकाणी आल्यावर रमेश बडिगेर आणि पांडप्पा यांच्यातील भांडणाचे रुपांतर अनर्थात झाले. त्यानंतर लक्ष्मीने पती पांडप्पाच्या डोक्यावर शेतीच्या अवजाराने प्रहार करून ठार केले. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने जागीच मरण पावलेल्या पांडप्पाचा मृतदेह दुचाकीवरून नेऊन होसूरजवळील लहान पुलाजवळ फेकण्यात आला. खून करून अपघात भासविण्याचा प्रयत्न करणारी लक्ष्मी आणि तिचा प्रियकर रमेश आता पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत.

एकंदर विवाहबाह्य अनैतिक संबंधाच्या पार्श्वभूमीवर एका निष्पाप जीवाचा बळी दिला गेला आहे. प्रियकरासह पतीची हत्या करणारी पत्नी आणि प्रियकर आता पोलिसांचे पाहुणे झाले आहेत. खूनप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Tags: