hubali

पंचमसाली समाजाचे उद्यापासून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन

Share

पंचमसाली समाजाला २ए श्रेणीत आरक्षण मिळावे या मागणीसाठी बऱ्याच कालावधीपासून सुरु असलेल्या आंदोलनाला नवे वळण मिळत असून सरकारने दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण न केल्यामुळे उद्यापासून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर भव्य धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे, अशी माहिती कुडलसंगमचे श्री बसवजय मृत्युंजय महास्वामी यांनी दिली.

 

हुबळी येथे पत्रकारांशी ते बोलत होते. शिग्गाव येथील चन्नम्मा चौकापासून रॅलीच्या माध्यमातून सुमारे एक लाख पंचमसाली समाजातील नागरिक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जाऊन धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत. लिंगायत धर्मातील सर्व समाजासाठी केंद्र सरकारने २ए श्रेणीत आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली असून याप्रश्नी सरकारने ४ वेळा आश्वासन दिले आहे.

मुलांना शिक्षण आणि या समाजातील नागरिकांना रोजगार मिळावा तसेच आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या या समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी करण्यात येत आहे. सरकारने दिलेले आश्वासन पाळले नसून उद्या १ लाख समाजबांधव धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत. तरीही सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष न पुरविल्यास ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात २५ लाख समाजबांधवांना घेऊन बंगळूरमध्ये भव्य आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वामींनी दिला.

 

यावेळी माजी आमदार आणि अखिल भारतीय पंचमसाली समाजाचे अध्यक्ष विजयानंद काशप्पानवर, द्यावनगौडर, विरेश उंडी, विजय कुलकर्णी आदींसह इतर समाजबांधव उपस्थित होते.

Tags:

POLITICS PROTEST