Belagavi

विभागवार कार्यालये सुवर्णसौधमध्ये स्थलांतरित करा : करवे.

Share

उत्तर कर्नाटकातील विकासासाठी पूरक असणारी राज्यस्तरीय कार्यालये तसेच बेळगाव जिल्हास्तरीय कार्यालये सुवर्णसौधमध्ये स्थलांतरित करण्यात यावीत, असा आग्रह करत कर्नाटक रक्षण वेदिकेच्या नारायणगौडा गटाने आंदोलन केले.

बेळगावमधील सुवर्णसौध हे उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी दिशादर्शक ठरावे. ऊर्जाकेंद्र बनावे, अशी उत्तर कर्नाटकातील जनतेची मोठी इच्छा आहे. या पार्श्वभूमीवर विविध विभागांची राज्यस्तरीय कार्यालये सुवर्णसौधमध्ये स्थलांतरित करण्यासाठी विधिमंडळाच्या अधिवेशनात निर्णय घ्यावा, अशी मागणी करत करवेच्या नारायणगौडा गटाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी निदर्शने केली. विभागीय कार्यालये सुवर्णसौध येथे स्थलांतरित न झाल्यास आंदोलन छेडण्याचा नारा देत सरकारला इशारा देण्यात आला.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना करवे राज्य संचालक महादेव तळवार यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी समन्वयक मंत्री नेमण्यासंदर्भात आवाज उठविला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकार योग्य पाठपुरावा करत असून कर्नाटक सरकार मात्र कोणत्याही प्रकारे याप्रश्नी गांभीर्याने लक्ष पुरवत नसल्याचे ते म्हणाले. बेळगावमधील सुवर्णसौध पोरकी झाली असून आगामी हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्यस्तरीय कार्यालये याठिकाणी स्थलांतरित करण्यात यावीत अन्यथा सरकारविरोधी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

याचप्रमाणे करवे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश गवन्नावार यांनीही सुवर्णसौधमध्ये राज्यस्तरीय कार्यालये स्थलांतरित करण्याचा मुद्दा उपस्थित करत आगामी हिवाळी अधिवेशनापूर्वी कार्यालये स्थलांतरित न केल्यास अधिवेशनादरम्यान कन्नड रक्षण वेदिका मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करेल, असा इशारा त्यांनी दिला.

या आंदोलनात करवे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी यांच्यासह करवेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: