Dharwad

कमिशनचा आरोप करणाऱ्या काँग्रेसने पुरावे द्यावेत : महेश टेंगिनकायी

Share

भाजप सरकार हे ४० टक्के कमिशनचे सरकार असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात असून काँग्रेसकडे यासंदर्भातील पुरावे असल्यास त्यांनी जाहीरपणे सादर करावेत असे आव्हान भाजप राज्य प्रधान सचिव महेश टेंगिनकाई यांनी काँग्रेसला दिले आहे.

हुबळी येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ४० टक्के कमिशनचा आरोप हा हवेत गोळी मारण्याप्रमाणे असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस सरकार काळातील सर्व भ्रष्टाचार भाजप सरकारने उजेडात आणले. शिक्षक भरपाईबाबत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल करून कारवाई केली परंतु काँग्रेसने यापूर्वी कोणतीही कारवाई केली नाही. आता भाजप हि सर्व कामे करत असल्याचे टेंगिनकायी म्हणाले.

काँग्रेसच्या भारत जोडो पदयात्रेवरदेखील त्यांनी टीका केली असून हि पदयात्रा काँग्रेसच्या नेत्यांसाठी काँग्रेस छोडो अशी असल्याचे ते म्हणाले. आतापर्यंत गोव्यातील ८ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून आता राज्यातील अनेक काँग्रेस नेते काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असल्याचे टेंगिनकायी म्हणाले.

९ ऑक्टोबरपासून माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील ५२ विधानसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यातील दौरा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे २७ सप्टेंबरपासून भाजप राज्याध्यक्ष नलिनकुमार कटील यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटनेसाठी दौरा करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. प्रत्येक जिल्ह्यात दोन राजकीय मेळावे भरविण्यात येणार असल्याची माहिती टेंगिनकायी यांनी दिली. याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील प्रत्येक महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यांचे दौरे करणार असल्याचे टेंगिनकयी म्हणाले.

या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष संजय कपटकर, सिद्दू मोगळीशेट्टर, विजयानंद शेट्टी, रवी नायक आदी उपस्थित होते.

Tags: