Chikkodi

शिक्षकीपेशा प्रामाणिकपणे जपणारे शिक्षक : अप्पासाहेब गिरेन्नावर

Share

शैक्षणिक क्षेत्रात असलेली उदासीनता हल्ली मोठ्या प्रमाणात चर्चिली जाते. त्यातूनही सरकारी शाळेतील शिक्षण, शिक्षण पद्धती, तेथील शिक्षक यावर पालकांची कायम तक्रार असते. मात्र अनेक शिक्षक हे केवळ शिक्षकी पेशा म्हणून नाही तर आपल्या जबाबदारी आणि कर्तव्य म्हणूनही सेवा बजाविताना दिसतात. याचेच एक उदाहरण म्हणजे चिकोडी येथील आदर्श शिक्षक अप्पासाहेब गिरेन्नावर…

सरकारी शाळेतील पटसंख्येबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी ग्राउंड लेव्हलवर कार्य करणारे अप्पासाहेब गिरेन्नावर. सरकारी शाळेतील बहुतांशी शिक्षक हे बेजबाबदार असतात, त्यांना वेळेचे भान नसते, शाळेतील विद्यार्थ्यांना शिस्त लावली जात नाही, सुधारणा होत नाही अशा अनेक तक्रारींना अपवाद असलेल्या अप्पासाहेब गिरेन्नावर यांनी एखादे आंदोलन राबवावे अशापद्धतीने विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविली आहे. चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील मूडलगी भागातील तुक्कानट्टी गावातील प्राथमिक शाळेत ते मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावत आहेत. त्यांना नुकताच राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

अप्पासाहेब गिरेन्नावर यांनी शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि सरकारी शाळेच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून शाळेतील पटसंख्या ३०० वरून ७५० पर्यंत वाढली आहे. शिक्षण विभागाने बेळगाव जिल्ह्यातील तुक्कनट्टी गावच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अप्पासाहेब गिरेण्णावर यांचा राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने गौरव केला. बंगळुरू येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, शिक्षणमंत्री बी.सी.नागेश यांच्याहस्ते गिरेन्नावर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आपल्याला मिळालेल्या पुरस्काराबद्दल अप्पासाहेब गिरेन्नावर यांची काय प्रतिक्रिया आहे जाणून घेऊयात..

शिक्षणाबाबत उदासीन असलेल्या तुक्कानट्टी या गावात गेल्या पाच वर्षांपासून गिरेन्नावर कार्यरत आहेत. शालेय मुलांसाठी अभ्यासक्रम व अभ्यासक्रमेतर उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी गोकाकाच्या म्युझिक स्टुडिओमध्ये विद्यार्थ्यांना नाटक, संगीत व स्मरण स्पर्धांसाठी आणून त्यांना संगीत व नाटकातील भूमिकांची जाणीव करून देण्याचे काम गिरेण्णावर यांनी केले आहे. तुक्कानट्टी गावात मुलांच्या माध्यमातूनच मिरवणुकीचे आयोजन करून सरकारी शाळेकडे मुले व पालकांचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक गिरेण्णावर यांनी महत्वपूर्ण परिश्रम घेतले आहेत. प्रत्येक आठवड्यात विद्यार्थ्यांना दोनवेळा जेवणाची व्यवस्था करत विविध पदार्थांची मेजवानीही ते देतात.. त्यांच्या या अनोख्या शिक्षण पद्धतीचे त्यांचे सहकारीही मोठे कौतुक करतात.

अप्पासाहेब गिरेण्णावर यांनी केलेल्या विकास कामाचे, शाळेतील सुधारणेचे कौतुक करत अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन कौतुक केले. इतकेच नाही तर या मतदारसंघाचे आमदार भालचंद्र जारकीहोळी, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, विभागीय शिक्षणाधिकारी अजित मन्नीकेरी यांनीही आप्पासाहेब गिरेन्नावर यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले आहे. केवळ नोकरी, पगार आणि आपला पेशा संभाळण्यापलीकडे आपण शिक्षक आहोत याकडे प्रामाणिकपणे पाहून प्रामाणिकपणे सेवा बजाविणारे अप्पासाहेब गिरेन्नावर हे आजच्या काळातील आदर्श शिक्षक म्हणण्यास पात्र आहेत, यात शंका नाही.

डी. के. उप्पार, आपली मराठी, चिकोडी

Tags: