Belagavi

मी ओके, प्रकृतीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका : आनंद मामनी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Share

कर्नाटक विधानसभेचे उपसभापती, सौंदत्तीचे आमदार आनंद मामनी यांच्या प्रकृतीबाबत अनेक अफवा पसरल्या असून त्यांनीच याबाबत एका व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून याबाबत खुलासा केला आहे. मला काहीच झाले नाही. कोणतीही चिंताजनक परिस्थिती नाही. हा फक्त आरोग्यातील थोडा चढउतार आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

सौंदत्तीचे आमदार आनंद मामनी यांना पंधरवड्यापूर्वी चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना यकृताचा त्रास असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, बुधवारी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पसरू लागली. त्यामुळे याबाबत त्यांनी स्वतः खुलासा केला आहे. माणसाच्या आयुष्यात आरोग्यातील चढउतार स्वाभाविक आहेत. मला काही वर्षांपासून मधुमेहाचा त्रास आहे. परंतु याबाबत काही प्रसार माध्यमांमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत. माझ्यावर गृहदैवत जलिकट्टी बसवण्णा, आई-वडील आणि राज्यातील जनतेचा आशीर्वाद आहे. कार्यकर्त्यांनी खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे त्यांनी चेन्नईतील एका खाजगी रुग्णालयातून प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ निवेदनात म्हटले आहे.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी फोनवरून माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्ही सर्व तुमच्या मागे आहोत असे त्यांनी सांगितले आहे. बी. एस. येडियुरप्पांसह अनेक आमदारांनी मला सल्ला दिला आहे. त्या संदर्भात मी धैर्याने येऊन त्या सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होणार आहे. कोणत्याही कारणास्तव घाबरण्याचा प्रश्नच येत नाही, असे ते म्हणाले. मी चेन्नईत असल्यामुळे चिंतेत असाल, मला हलविण्याबद्दल जी काही चर्चा सुरु आहे ती खोटी आहे. चेन्नईच्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर मोठे तज्ज्ञ डॉक्टर तपासून औषध देतील. लवकरात लवकर राजधानीत येऊन तुमच्याशी संपर्क साधणार असल्याचे आनंद मामनी यांनी सांगितले.

दरम्यान, आनंद मामनी यांच्या तपासणीसाठी लंडनहून यकृत तज्ज्ञ येणार असल्याची माहिती आहे. एकंदरीत आनंद मामनी यांच्या चाहत्यांनी ते लवकर बरे व्हावेत अशा शुभेच्छा त्यांना दिल्या आहेत.

Tags: