बेळगाव जिल्ह्यात अलीकडच्या काळात बालक चोरीची एकही घटना घडलेली नाही. त्याचप्रमाणे बेळगाव जिल्ह्यात बालकांचे अपहरण किंवा शारीरिक अत्याचाराची एकही घटना नोंदलेली नाही. त्यामुळे अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी केले आहे.
बेळगाव जिल्ह्यात बालक चोरीच्या वाढत्या अफवांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ.संजीव पाटील यांनी प्रसार माध्यमांना एक व्हिडिओ निवेदन जारी केले आहे. बेळगाव जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये परराज्यातून मुले चोरणारी टोळी आली आहे, लहान मुलांना पळवून नेले जात असून त्यांच्या शरीरातील अवयव काढून त्यांची विक्री केली जात असल्याच्या अफवा ऐकायला मिळतात.
मुळात अशा घटना घडलेल्याच नाहीत, हे यापूर्वीच प्रसार माध्यमांद्वारे स्पष्ट करण्यात आले होते. एकदा नंदगडमध्ये गालिचे विकणाऱ्या लोकांना पकडले आणि ते बालचोर असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यांची चौकशी केली असता ते दुसऱ्या राज्यातून गालिचे विकण्यासाठी आले असून बेळगाव येथे राहत होता, अशी खात्रीलायक माहिती मिळाली. एका आजारी व्यक्तीला नंदगड पोलीस ठाण्यात काहींनी आणून त्याच्यावर संशय असल्याचे सांगितले. त्याची चौकशी केली असता तो घर सोडून आला होता, त्याने कोणतीही चोरी केली नसल्याचे स्पष्ट झाले असे एसपी डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.
अशाच प्रकारची अफवा बैलहोंगल पोलीस ठाण्यातही ऐकायला मिळाली. चौकशी केली असता तेथेही अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे समोर आले. कित्तूरमध्येही मुले चोरणाऱ्यांनी एका बालकाला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना ऐकल्यानंतर बैलहोंगल डीएसपीनी स्वतः त्या ठिकाणी भेट दिली आणि तपासणी केल्यानंतर त्यांनी ही केवळ अफवा असल्याचे सांगितले.
कुलगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत उत्तर भारतातून आलेल्या काही साधूंबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता ते उत्तर प्रदेशातील अलिगड आणि हातसारा जिल्ह्यातून येऊन रामेश्वरला जात असल्याचे समोर आले. मंगळवारी शिरसांगी गावात आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींना बालचोर असल्याचा संशय आल्याने खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांनी 112 वर फोन करून तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी हे दोघे व त्यांच्यासोबत आलेले इतर दोन लोक लॉजमध्ये राहत होते आणि हे सर्वजण नागपुरातील एका आश्रमासाठी देणगी गोळा करण्यासाठी आले होते, असे एसपींनी सांगितले.
अलीकडच्या काळात बेळगाव जिल्ह्यात बालक चोरीची एकही घटना घडलेली नाही. बेळगाव जिल्ह्यात बालकांचे अपहरण किंवा शारीरिक अत्याचाराची एकही घटना नोंदलेली नाही. त्यामुळे अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. तसेच कायदा हातात घेऊ नये. तुमच्या परिसरात अनोळखी व्यक्ती दिसल्यास ताबडतोब 112 वर कॉल करा आणि पोलिसांना कळवा. स्थानिक पोलिस तुमच्या ठिकाणी येतील आणि सत्यता पडताळतील आणि माहिती देतील. याबाबत सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन एसपी डॉ.संजीव पाटील यांनी केले.
एकंदर, बेळगाव जिल्ह्यातील बालक चोरीच्या घटना या निव्वळ अफवा असल्याचे स्पष्टीकरण पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी दिले आहे. त्यामुळे जनतेने घाबरण्याची गरज नाही.


Recent Comments