बेळगाव महानगरपालिकेत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य संजीवनी योजना लागू करावी या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आज सकाळी महापालिका आवारात घोषणाबाजी करत निदर्शने केली.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या नावाचे निवेदन पालिका आयुक्तांना देण्यात आले.
राज्य सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्याना नवी आरोग्य संजीवनी योजना लागू करावी अशी मागणी करत पालिका कर्मचाऱ्यांनी बेळगाव महानगर पालिकेसमोर आज, बुधवारी सकाळी पालिकेसमोर निदर्शने केली. ही योजना पालिकेत काम करणाऱ्या पौरकार्मिकांनाही लागू करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना महानगरपालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मलिक गुंडप्पनावर यांनी सांगितले की, पालिका कर्मचाऱ्यांना आणि पौरकार्मिकांनासुद्धा ही आरोग्य संजीवनी योजना लागू करण्याची आमची मागणी आहे. यासाठी आधीही आम्ही निवेदन दिले आहे. पण सरकारकडून त्याची पूर्तता झालेली नाही.
त्यामुळे आमच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज दुपारपर्यंत कामावर बहिष्कार टाकून निदर्शने करून आंदोलन छेडले आहे. राज्यातील १० महानगरपालिकात एकाचवेळी हे आंदोलन करण्यात येत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या नावाचे निवेदन आयुक्तांना देणार आहोत असे त्यांनी सांगितले. या निदर्शनात भरत तळवार, सुरेश द्यामन्नावर, महांतेश नाईक, राजश्री जाधव यांच्यासह बेळगाव महापालिकेच्या महसूल, आरोग्य, पर्यावरण आदी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.


Recent Comments