विधिमंडळ अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली असून अधिवेशनाच्या काळात आज राजकालव्याच्या कामकाजाविषयी चर्चा करण्यात आली. मुसळधार पावसामुळे बेंगळुरूला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून कोणत्याही अडथळ्याशिवाय राजकालव्याचे कामकाज पूर्ण करू असे आश्वासन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले.
विधिमंडळ अधिवेशनात मंगळवारी बेंगळुरूमध्ये अतिवृष्टीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात चर्चा झाली. काँग्रेस सदस्य कृष्णभैरेगौडा यांनी बंगळुरूमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीचा मुद्दा उपस्थित करत प्रस्ताव मांडला. बेंगळुरूमधील बहुतांशी भाग पाण्याखाली बुडाला आहे. मालमत्तेचे, अन्नधान्याचे नुकसान तसेच जीवितहानी झाली आहे. बंगळुरूची प्रतिष्ठा आणि येथील जनजीवनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर धोका निर्माण झाला आहे. भविष्यात बंगळुरूमध्ये राहणाऱ्या जनतेला धोका निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे. बेंगळुरूमधील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी कालव्यांचा पूर्ण विकास होणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार ८५० किलोमीटर परिसरात राजकालाव आहे. यापूर्वीच्या सरकार काळात ४०० किलोमीटर पर्यंतच्या राजकालव्याचं विकास करण्यासाठी सिध्दरामय्यांनी १९०० कोटी रुपयांचे अनुदान दिले होते. अद्याप ४५० किलोमीटर कालव्याचा विकास होणे बाकी आहे. मागील काही वर्षात ३५ किलोमीटर पर्यंतच कालव्याचा विकास झाला असून उर्वरित कालव्याच्या भागाचा विकास होणे आवश्यक असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.
यानंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, राजकालव्याचे बांधकाम जवळपास २० वर्षांपासून सुरु आहे. आतापर्यंत ४५० किलोमीटरचे बांधकाम पूर्ण झाले आहे. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे राजकालव्याला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. नैसर्गिकरित्या राजकालव्यातून पाणी सोडले असते तर मोठ्या प्रमाणात पाणी बंगळुरूच्या बाहेर सोडता आले असते. आता राजकालव्याच्या निर्मितीसाठी १५०० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले असून सर्व निविदा देखील मागविण्यात आल्या आहेत.
राजकालव्याच्या विकासदरम्यान अतिक्रमण, इमारती आड येत असून यादरम्यान उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण होणे आवश्यक असून यासाठी आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. विकासकामात येणाऱ्या अडचणी, इमारती, अतिक्रमण यासह इतर समस्या दूर करून ८५० किलोमीटरच्या राजकालव्याचे बांधकाम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.


Recent Comments