गणेश विसर्जनाच्या वेळी सुरू झालेल्या भांडणात तरुणाचा खून झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील यरगट्टी तालुक्यातील मुगळीहाळ गावात घडली आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


20 वर्षीय अर्जुनगौडा पाटील, रा. मुगळीहाळ, ता यरगट्टी, जि. बेळगाव असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मुगळीहाळ गावात शुक्रवारी सायंकाळी गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी दोन गटात सुरू झालेल्या हाणामारीचे रुपांतर एका तरुणाच्या खुनात झाले. दुसऱ्या गटातील तरुणांनी अर्जुनगौडा याच्यावर चाकूने वार केले. यावेळी अर्जुनगौडा खाली कोसळला.
त्यानंतर मारेकरी पळून गेले. पूववैमनस्यातून हा खून झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

या प्रकरणी संशयित आरोपी उदय बन्ड्रोळी, वय 21, सुभाष सोलन्नावर, वय 21, विठ्ठल मिशी, वय 20 आणि एका विधिसंघर्षग्रस्त मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील तिन्ही सज्ञान संशयित कॉलेजचे विध्यार्थी आहेत.
खुनाच्या घटनेनंतर मुगळीहाळ गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मुरगोड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली.
खून झालेल्या अर्जुनगौडाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.


Recent Comments