गणेशोत्सवाच्या औचित्याने कागवाड येथील शेडबाळ स्टेशन गावात बालगोपाल गणेश मंडळ आणि उगार लायन्स क्लब यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात कागवाडचे पीएसआय बी एम रबकवी यांचा वाढदिवसदेखील साजरा करण्यात आला.
या शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून कागवाडचे पीएसआय बी एम रबकवी हे उपस्थित होते. यावेळी बोलताना रबकवी म्हणाले, युवकांनी गणेशेत्सव आनंदात साजरा करावा. याकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घ्यावी. रक्तदान शिबिरातील युवकांचा सहभाग हा इतर मंडळांसाठी आदर्श बनला असून अधिकाधिक तरुणांनी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उगार लायन्स क्लबचे अध्यक्ष ज्योतिकुमार पाटील हे होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, तरुणांनी रक्तदान केल्यास त्यांचे आरोग्य सुधारेल. त्यात रक्तदान केल्यास वर्षभर कोणताही आजार होणार नाही. शेडबाळ येथील बालगोपाळ गणेश मंडळाच्या तरुणांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन इतर मंडळातील तरुणांसाठी आदर्श निर्माण केला आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी मिरज येथील एमएसआय रक्तपेढीचे डॉक्टर दीपक पाटील यांनी शरद ऋतूमध्ये रक्तदान केल्याने होणारे फायदे सांगून युवकांनी रक्तदान करून इतरांना मदत करावी, असे आवाहन केले.
यावेळी ५१ युवकांनी रक्तदान केले. या सर्वांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी डॉ. दीपक पाटील, अझर जमादार, शशी पाटील, बालगोपाल गणेश मंडळाचे सदस्य बाळासाहेब हिरलेकर, संदेश आलासे, सौरभ कोळी, अविनाश चिक्कलगे, प्रतीक ब्रागाले, अनिल चिक्कलगे, फारूक अलास्कर, गिरीश मांजरेकर, महावीर अलासे, शुभम काळे आदींसह मंडळाचे कार्यकर्ते, सदस्य उपस्थित होते.


Recent Comments