गोवा राज्यातून अवैधरित्या गोवा बनावटीची दारू आणून विक्री करणाऱ्या दोघांना बेळगाव सीसीबी पोलिसांनी बेळगाव तालुक्यातील बहाद्दरवाडी–कर्ले येथे छापा टाकून अटक केली. यावेळी गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा, एक कार व एक मोपेड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या डीसीपी पी. व्ही. स्नेहा यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीबीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निंगनगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बेळगाव तालुक्यातील बहाद्दरवाडी-कर्ले येथील लक्ष्मण उर्फ बाळ्या सातेरी पाटील हा गोव्यातून बेकायदेशीरपणे वेगवेगळ्या ब्रँडच्या दारूच्या बाटल्या आणून कारच्या डिक्कीत ठेवून आपल्या मुलांकरवी त्याची विक्री करत होता. याची माहिती मिळताच सीसीबी पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली. या प्रकरणी बहाद्दरवाडी येथील साहिल लक्ष्मण पाटील व एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे.
त्यांच्याकडून फक्त गोवा राज्यात विक्रीसाठी उपलब्ध असणाऱ्या 108 लिटरच्या 189 दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय दारू विक्रीसाठी वापरलेली 1 टोयोटा इटिओस कार क्रमांक KA-04/AB-2166, 1 मोपेड दुचाकी पोलिसांनी जप्त केली. या कारवाईत सीसीबीचे पोलीस निरीक्षक निंगनगौडा पाटील व कर्मचारी एच.एस.निसन्नावर, एस.बी.पाटील, एम.एम.वडेयार, एस.एम.भजंत्री, वाय.डी.नदाफ यांचा सहभाग होता. त्यांच्या या कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सीसीबी अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.


Recent Comments