Belagavi

विधानसभा निवडणुकीच्या मुहूर्तावर काँग्रेसमध्ये नाराजीसत्र

Share

बेळगाव दक्षिण मतदार संघासाठी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या नावावरून काँग्रेसमध्ये नाराजीसत्र सुरु झाले असून इच्छुक उमेदवारांविरोधात काँग्रेसमधील विविध नेत्यांनी राजीनामा देण्याची तयारी सुरु केली आहे.

२०२३ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी माजी आमदार रमेश कुडाची, सरला सातपती  यांच्या नावाची चर्चा सुरु असून काँग्रेसमधील हे दोन्ही उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याची बातमी एका खाजगी वाहिनीवरून प्रसारित झाली होती. यानंतर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष परशुराम ढगे यांच्या नेतृत्वाखाली विविध काँग्रेस नेत्यांची सभा घेण्यात आली असून या सभेत परशुराम ढगे यांनी रमेश कुडची, सरला सातपती यांच्या उमेदवारीवरून एससी मोर्चा, विणकर समाज, ओबीसी मोर्चा यासह विविध समाजाच्या नेत्यांनी विरोध दर्शविल्याचे सांगत राजीनामा देण्याची तयारी दाखविली आहे.

 

 

आज बोलाविण्यात आलेल्या सभेत दोन्ही इच्छुक उमेदवारांविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली असून आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा योग्य उमेदवार निवडण्यासंदर्भात आमदार सतीश जारकीहोळी यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

 

 

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोणालाही उमेदवारी देण्यास आमचा आक्षेप नाही. मात्र उमेदवार अनुभवी, आपल्या मतदार संघाविषयी पूर्ण माहिती असलेला आणि तळागाळापर्यंत काम करणारा असावा. या निकषातून उमेदवार निवडण्यात आल्यास दक्षिण मतदार संघात काँग्रेसचा उमेदवार नक्की निवडून येईल. विधानसभा निवडणुकीत आपली सत्ता आल्यास दक्षिण मतदार संघातील अधिकाधिक कामगारांना महामंडळात जागा देण्यात याव्यात, समाजाचा पाठिंबा असावा, यासाठी सतीश जारकीहोळी यांच्याशी चर्चा करण्यात येणार असून ते घेतील त्या निर्णयाशी आम्ही बांधील असू अशी प्रतिक्रिया देण्यात आली.

 

 

यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल, नगरसेवक खुर्शीद मुल्ला, आनंद शिरूर, भोजाप्पा हजेरी यासह इतर काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते

Tags:

#congress election belgaum pressmeet