उत्तर कर्नाटकाचा खंबीर आवाज, थेट बोली आणि रोखठोख मुद्दे मांडून सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या बेळगावमधील बेल्लद बागेवाडी येथील मंत्री उमेश कत्ती यांच्या निधनानंतर भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसला असून त्यांच्या जाण्याने पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.. नऊ निवडणुकांपैकी आठ निवडणुका जिंकत राजकारणात आपली छाप पाडणाऱ्या उमेश कत्ती यांच्या निधनाने त्यांच्या अनेक मागण्या स्वप्नवत राहिल्या आहेत…. कसा होता त्यांचा जीवनप्रवास जाणून घेऊयात या विशेष रिपोर्टमधून…

बेंगळुरू येथे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच वनमंत्री उमेश कत्ती यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर बेळगावसह राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राजकारणात वरच्या रांगेत असणाऱ्या मंत्र्यांपैकी एक असलेले उमेश कत्ती यांचा जन्म १४ मार्च १९६४ रोजी बेळगावमधील बेल्लद बागेवाडी येथे झाला. विश्वनाथ आणि राजेश्वरी कत्ती यांचे सुपुत्र असलेले उमेश कत्ती यांनी १९८५ साली राजकारणात प्रवेश केला. माजी आमदार दिवंगत विश्वनाथ कत्ती यांच्या निधनानंतरदेखील हुक्केरी मतदार संघातील पद रिक्त झाले. यानंतर जनता पक्षातून उमेश कत्ती यांनी राजकारणात प्रवेश केला. १९८५ साली आमदार म्हणून विधानसौधची पायरी चढलेल्या उमेश कत्ती यांनी आजतागायत कधीच मागे वळून पाहिले नाही. उत्तर कर्नाटकातील लिंगायत समाजाचे प्रभावी नेते, जनता दल, भाजपमध्ये मंत्रिपद भोगलेले उमेश कत्ती यांनी आजतागायत ९ निवडणुका लढविल्या. यातील केवळ १ निवडणूक वगळता सर्व निवडणुकीत त्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाचा मुद्दा असो किंवा स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्याचा मुद्दा याबाबत आवाज उठविताना नेहमीच त्यांनी स्फोटक भाषण करत सर्वांचे लक्ष वेधले. उत्तर कर्नाटकावर अन्याय झाल्यास आपण शांत बसणार नाही, असा इशारा आपल्याच पक्षाच्या नेत्यांना देणारे उमेश कत्ती हे आपल्या विशिष्ट शैलीमुळे प्रसिद्ध होते. १९८५ मध्ये ते पहिल्यांदा जनता पक्षाकडून आमदार म्हणून निवडून आले

त्यानंतर १९८९, १९९४, १९९९, २००४, २००८, २०१३, २०१८ साली झालेल्या निवडणुकीत संयुक्त जनता दल, निधर्मी जनता दल, काँग्रेस, भाजपमधून निवडणूक लढविली. नऊवेळा निवडणूक लढविले उमेश कत्ती २००४ साली काँग्रेसमधून निवडणूक लढविताना शशिकांत नाईक यांच्याकडून पराभूत झाले. हि एक निवडणूक वगळता आठही निवडणुकीत त्यांनी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. १९९४ साली जनता दलाच्या सरकार काळात प्रथम साखर मंत्रीपदी ते विराजमान झाले. त्यानंतर १९९६ मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री, २००८ साली कृषी मंत्री, आणि सध्या बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक व्यवहार, वनमंत्री म्हणून ते कामकाज पाहात होते.
जनता पक्षातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे उमेश कत्ती यांनी नंतर जनता दलात प्रवेश केला. जनता दल फुटल्यावर जेएच पटेल गटाच्या पाठीशी ते उभे राहिले आणि जेडीयूमध्ये सामील झाले. पटेल यांच्या निधनानंतर ते जेडीएसमध्ये सामील होऊ शकले नाहीत, परंतु २००४ मध्ये ते काँग्रेसमध्ये सामील झाले आणि यावेळी त्यांना पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला. २००८ मध्ये त्यांनी जेडीएसमध्ये प्रवेश केला आणि यावेळी पुन्हा ते निवडणून आले. आमदार पदाचा राजीनामा देऊन पोटनिवडणूक लढवण्यासाठी आणि जिंकण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. आणि इथूनच त्यांचा भाजपमधील प्रवास सुरु झाला.
सिंचन प्रकल्पातून कृष्णेचे पाणी महाराष्ट्राला सोडण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत उमेश कत्ती यांनी उत्तर कर्नाटकसाठी वेगळे राज्य निर्माण करण्याची मागणी करत वादग्रस्त विधान केले. उमेश कत्ती हे केवळ राजकारणी नव्हते तर ते व्यापारी आणि शेतकरीही होते. त्यांच्या मालकीचा बेळगावात साखर कारखाना देखील आहे. उमेश कत्ती यांच्यासारख्या मातब्बर राजकारण्याचे जाणे ही केवळ बेळगाव जिल्ह्याचीच नव्हे तर संपूर्ण राज्याची कधीही भरून न येणारी हानी आहे. त्यांच्या निधनाबाबत हुक्केरी हिरेमठचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी आणि कारंजीमठचे गुरुसिद्ध महास्वामी यांनी शोक व्यक्त केला आहे.
आलमट्टी आणि वृंदावनच्या आदर्शावर हिडकल धरणाचा विकास करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेश कत्ती यांनी अखंड राज्याचे मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून त्यांच्या जाण्याने न भरून येणारे नुकसान झाल्याचे मत राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.


Recent Comments