माणूस म्हणून आपल्याला छोटे–छोटे क्षण आनंदाने साजरे करण्याची सवय लावली पाहिजे, छोट्या तक्रारी, वाद–विवाद बाजूला सारून आयुष्यात चांगले जगले पाहिजे असे मत विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी व्यक्त केले.
बेळगावातील महांतेश नगर रहिवासी संघटनेच्या वतीने 50 व्या सुवर्ण महोत्सवी गणेशोत्सवाच्या सोहळा सोमवारी सायंकाळी पार पडला. सार्वजनिक श्रीगणेश उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार, विनोदी व संगीत कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून चन्नराज हट्टीहोळी बोलत होते. ते म्हणाले, चेहऱ्यावर हास्य असेल तर चेहऱ्याच्या सौंदर्यासोबतच मनःशांती वाढते. त्याचप्रमाणे आपल्या चेहऱ्यावर छोटंसं हसू असेल तर आपल्या सभोवतालचं वातावरण शांत होईल. जीवनात हसल्याने चांगले आरोग्य मिळू शकते, हसणे हे उत्तम आरोग्याचे औषध आहे. हे जीवन म्हणजे तीन दिवसांचा उत्सव आहे, जोपर्यंत टिकेल तोपर्यंत हसतमुखाने जगूया आणि इतरांना आनंदी करूया, असे ते म्हणाले.
हुक्केरी हिरेमठचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य कार्यक्रमाच्या दिव्य सानिध्याच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाला आमदार अनिल बेनके, चित्रपट अभिनेते अभिलाष, महांतेश नगरचे नेते उमेश आचार्य, राजू शेठ, मदनकुमार भैरप्पनावर, गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, महांतेश नगरमधील रहिवासी आदी उपस्थित होते.


Recent Comments