उगार साखर कारखान्याचा 80 वा जिमखाना दिन कार्यक्रम रविवारी उगार येथे जल्लोषात पार पडला.
उगार शुगर्सच्या जिमखाना दिनी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय क्रिकेटपटू जतीन परांजपे यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम पार पडले. जतीन परांजपे यांच्या हस्ते क्रीडांगणावर क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले. साखर कारखान्याचे एमडी व जिमखान्याचे अध्यक्ष चंदन शिरगावकर अध्यक्षस्थानी होते.
उगार साखर कारखान्याचे कामगार, अधिकारी व नागरिक अशा प्रकारात विविध क्रीडास्पर्धा व कार्यक्रम झाले.

यावेळी जतीन परांजपे यांनी कारखान्याच्या खेळाडूंसोबत क्रिकेट खेळून आनंद लुटला.
यावेळी बोलताना जतीन परांजपे म्हणाले की, माझे वडील वासुदेव, बॉम्बेचे क्रिकेटर त्याचबरोबर बॉम्बे आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी या दोन्ही संघांचे प्रशिक्षक होते. त्यांनी सुनील गावस्कर आणि संजय मांजरेकर या दोघांना मार्गदर्शन केले होते. मी 1999 ते 2002 दरम्यान मुंबई क्रिकेट संघाचा खेळाडू म्हणून आणि 1999-1998 पर्यंत भारतीय क्रिकेटपटू म्हणून खेळलो. मी चार वर्षे संघ निवडीचे काम केले, आजचा भारतीय संघ संपूर्ण जगात एक चांगला संघ म्हणून उदयास आला आहे. आगामी विश्वचषक भारतच जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. मी डावखुरा खेळाडू असून माझी प्रेरणा ब्रायन लारा आहे, असे त्यांनी सांगितले.
जिमखाना सचिव भुजबली अकिवाटे, सहसचिव सचिन शिंदे तसेच आयोजकांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.


Recent Comments