काल ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या आढळून आला नाही. मात्र परवा तो ट्रॅप कॅमेऱ्यात दिसून आला होता. तसेच काल सकाळी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याची माहिती डीएफओ डॉ. अँटोनी मरियम यांनी आज दिली.
बेळगावच्या गोल्फ मैदानात बिबट्याला पकडण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईबाबत डीएफओ डॉ. अँटोनी मरियम यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बिबट्याला पकडण्यासाठी त्याच्या हालचाली, ठावठिकाणा सापडला पाहिजे. त्यासाठी त्याला ४-५ दिवस मुक्त सोडले पाहिजे. पण दररोज लोकांच्या अपेक्षा वाढत आहेत. तशातच पाऊसही पडत असल्याने मोहिमेत काही समस्या येत आहेत. बिबट्याचा वावर कॅमेऱ्यात दिसलेला नाही. आज किंवा उद्या पावसाबाबत यलो अलर्ट असल्याने आम्ही हनीट्रॅप आणि कॅमेरा ट्रॅपद्वारे मोहीम राबविण्यात येईल. सध्या पाऊस पडत असल्याने आम्ही किमान कर्मचारी घेऊन हत्तींच्या मदतीने गोल्फ कोर्स परिसरात मोहीम राबवत आहोत असे त्यांनी सांगितले.
कमी लोक म्हणजे आत कमी कर्मचारी घेऊन मोहीम सुरु आहे. पण बाहेर काही बदल केलेला नाही. गोल्फ कोर्सबाहेर वनरक्षकांचा कडेकोट बंदोबस्त आहे. बिबट्या चपळ प्राणी आहे. तो एका विशीष्ट ठिकाणी अजूनही थांबलेला नाही. क्षणाक्षणाला जागा बदलत आहे. त्यामुळे युनिटच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पकडण्यासाठी लावलेले पिंजरे दुसऱ्या ठिकाणी हलवणार असल्याचे डीएफओ डॉ. अँटोनी मरियम यांनी स्पष्ट केले.
गोल्फ कोर्स परिसरातील शाळा सुरू करता येणार नाहीत का, या प्रसार माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना जिल्हा प्रशासनाने शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घ्यावा. आम्ही त्यावर बोलणार नाही. आम्ही गोल्फ कोर्सबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. पण या विषयावर आमचे मत विचारल्यास जिल्हा प्रशासनाला कळवू, असे त्यांनी सांगितले.
एकंदर, वनखाते लवकरच बिबट्याला पकडू शकेल. त्यामुळे जनतेने घाबरून जाऊ नये असे आवाहन डीएफओ डॉ. अँटोनी मरियम यांनी केले आहे.


Recent Comments